

खडकवासला: खडकवासलासह हवेली तालुक्यात लम्पीसदृश रोगाने तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शासकीय पशुवैद्यकीय विभागाने खडकवासला, किरकटवाडी, सिंहगड भागासह तालुक्यात गायी, बैल आदी जनावरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू केली आहे.
खडकवासला येथील तानाजी रघुनाथ मते यांचा एक बैल आणि देहू येथील दोन वासरे, अशी एकूण तीन जनावरे लप्मीसदृश रोगाने दगावली असल्याचे हवेली तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश काळे यांनी सांगितले. मृत जनावरांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल आल्यानंतर या जनावरांचा मृत्यू कोणत्या रोगाने झाला, हे स्पष्ट होईल, असेही काळे यांनी सांगितले. (Latest Pune News)
खडकवासलासह हवेलीत 55जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यातील 18 जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने शासनाने पूर्वीप्रमाणे लप्मीच्या रोगाने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी खडकवासला विधानसभा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल मते व समता फाउंडेशनचे अध्यक्ष सागर कोल्हे यांनी केली आहे.