

शिरूर: शिरूर पूर्वला राहुल पाचर्णे, आंबेगाव तालुक्याला जोडल्या गेलेल्या शिरूर तालुक्यातील 42 गावांसाठी संयोगिता तानाजी पलांडे व उर्वरित शिरूरसाठी जयेश शिंदे अशा 3 जणांची भाजपच्या शिरूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यापूर्वी तालुक्याला एकच अध्यक्ष असायचा. हा पायंडा मोडीत काढत तालुक्याला तीन अध्यक्ष नियुक्त करीत भाजपने नवीन पॅटर्न राबविला आहे. ’70 बूथमागे एक अध्यक्ष’ या धोरणानुसार भाजपा निवड करीत असून, हा पॅटर्न यापूर्वी गुजरातमध्येसुद्धा राबविला गेला असल्याचे भाजप कार्यकर्ते सांगत आहेत. हे तीनही अध्यक्ष आता आपली कार्यकारिणी बनवणार असल्याने अनेक उपाध्यक्ष, सचिव, गट आणि गण प्रमुख यांना संधी मिळणार असल्याने बहुसंख्येने कार्यकर्त्यांची वर्णी लागणार आहे.(Latest Pune News)
प्रदीप कंद यांचे वर्चस्व
शिरूर तालुक्यात अध्यक्षपदाच्या निवडीवर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचे वर्चस्व राहिल्याची चर्चा खुद्द भाजपामध्ये आहे. दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे यांची भाजपा तालुकाध्यक्षपदी अनेक अडथळ्यानंतर निवड झाल्याची चर्चा आहे.
शिरूर तालुक्यात इतर पक्षातून आलेल्यांना संधी मिळाल्याने जुने कार्यकर्ते नाराज आहेत. तालुकाध्यक्षपदाच्या निवडीसाठी गटबाजी होऊन बोलावले नसल्याचे काही कार्यकर्ते सांगत आहे. पक्ष वाढला, कार्यकर्ते वाढले तर मतभेद देखील वाढतात. पक्ष संघटनावर यासाठी तीन तालुकाध्यक्ष देण्यात आले असते तरी पक्षात गटबाजी न होता पक्ष एकसंघ राहील याची वरिष्ठ नेत्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.