

पिंपरी : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची सुपारी निघाली असून मीच ती सुपारी घेतली आहे, अशी धमकी एकाने थेट पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून दिली. हा प्रकार शनिवारी (दि. ८) दुपारी घडला. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सूत्रे फिरवत अवघ्या काही तासातच संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे. राय (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी डायल ११२ या पोलिस नियंत्रण कक्षावर एका अज्ञात इसमाचा फोन आला. "भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची सुपारी निघाली असून मीच ती सुपारी घेतली आहे, अशी माहिती त्याने दिली.
या कॉलची गंभीर दखल घेत पोलिसांनी अवघ्या काही तासातच संबंधित आरोपीचा माग काढत त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपीने दारूच्या नशेत किंवा खोडसाळपणे हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.