

पुणे: दूषित पाणी आणि अन्न, बदललेले हवामान, लोकसंख्या वाढ, अस्वच्छता आदी कारणांमुळे शहरात साथरोगांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात अतिसार आणि जुलाबाचा त्रास असलेले एक हजार रुग्ण आढळून आले आहेत. गुलेन बॅरी सिंड्रोमचा प्रसार दूषित पाण्यातून होत असल्याने आणि मुख्यत: उलट्या, जुलाब ही लक्षणे असल्याने पाणी उकळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत साथरोग विभागाचा समावेश आहे. त्याअंतर्गत 31 प्रकारच्या साथरोगाच्या रुग्णांची नोंद होत आहे. यामध्ये डायरिया, कावीळ, टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू, मिनिंजायटिस, कांजिण्या, ताप, कॉलरा, रेबिज, गॅस्ट्रो आदी प्रकारच्या रुग्णांचा समावेश आहे.
श्वसनरोग, इन्फ्लूएंझाचे 5 हजार 817 रुग्ण
यामध्ये श्वसनरोग, इन्फ्लूएंझाचे रुग्ण सर्वाधिक आढळून आले आहेत. शहरात वाढलेले धुळीचे प्रमाण, प्रदूषण आदी कारणांमुळे शहरातील श्वसनरोग रुग्णांची संख्या वाढली आहे. म्हणून नाक, घसा आणि फुप्फुसांचा संसर्ग करणार्या इन्फ्लूएंझाच्या रुग्णांची संख्या साडेपाच हजारांहून अधिक आहे. सोबत तापाच्या रुग्णांची संख्याही सात हजारांहून अधिक आहे, तर न्यूमोनियाच्या रुग्णांची संख्या 52 हजार 125 झाली आहे.
डायरियाच्या रुग्णांची संख्या एक हजारपर्यंत
डायरिया म्हणजेच अतिसार हा पोटविकार आहे. दूषित पाण्यामुळे, अन्नातून पसरणार्या बॅक्टेरिया, व्हायरसमुळे होतो. शहरात तब्बल 2 हजार 580 डायरिया रुग्णांची नोंद मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच डिसेंट्री म्हणजेच आमांशच्या रुग्णांची संख्याही वाढली असून, ती 560 इतकी आहे. तसेच गॅस्ट्रोची रुग्णसंख्या 70 नोंदवली गेली आहे.
ओपीडीमध्ये 96 हजार रुग्णांची नोंद
महापालिका रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये म्हणजे ओपीडीमध्ये एका महिन्यात 96 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे महापालिकेच्या 52 दवाखान्यांमध्ये ओपीडीची सोय आहे. आता त्यामध्ये आणखी आरोग्यवर्धिनी केंद्रांचीही भर पडली आहे. तसेच या बाह्यरुग्ण विभागांमध्ये दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण उपचार घेतात.