

Pune Politics: बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिप नुकतीच भाजपने व्हायरल केली आहे. या प्रकरणाची निःपक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र मी नाना पटोले व सुप्रिया सुळे यांचा आवाज चांगला ओळखतो. त्यामुळे ते आवाज त्या दोघांचेच आहेत. चौकशीनंतरच यामागील गुपित काय आहे ते बाहेर येईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
काटेवाडी येथे बुधवारी (ता. २०) सकाळी सातच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, जय पवार यांनी विधानसभेसाठी मतदान केले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, विनोद तावडे प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून घेतली आहे. त्याबद्दल सक्षम अधिकारी त्याचा तपास करतील. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच याचा मास्टरमाईंड कोण? या प्रकरणातील खरे खोटे काय? तसेच व्हिडिओ क्लिपची सत्यता देखील समोरील येईल. बारामतीमध्ये माझे कार्यकर्ते ज्या ठिकाणी बसतात त्या नटराज नाट्यकला मंदिर येथे देखील निवडणूक आयोगाच्या वतीने तपासणी करण्यात आली होती.
त्याबाबत कुठेही वाच्यता झाली नाही. प्रचारादरम्यान माझ्या हेलिकॉप्टर मध्ये देखील तपासणी झाली होती. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र आम्ही त्याचा बाऊ केला नाही. उगीचच आकाडतांडव केले नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरयू मोटर्समध्ये झालेल्या तपासणीबाबत भूमिका मांडली.
बारामतीतून मोठ्या मताधिक्याने विजय
लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील आमच्या घरातीलच उमेदवारांमध्ये लढत आहे. मात्र मला पूर्ण विश्वास आहे की बारामतीकर यंदा मला चांगल्या मतांनी निवडून देतील. बारामतीमध्ये भावनिक राजकारण होते काय या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मी कधी भावनिक राजकारण केले? तुम्ही माझ्या सांगता सभेतील भाषण पाहिले असेल यावेळी मी फक्त मी पाच वर्षांमध्ये काय केले व पुढील पाच वर्षात काय करणार आहे याचा लेखाजोखा मांडला.
मला विश्वास आहे की बारामतीकर यंदा देखील मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील. ही निवडणूक आपल्याला अवघड वाटत होती का यावर अजित पवार म्हणाले, अजिबात नाही. मलाही निवडणूक विकासावर न्यायची होती. कोणावरही टीकाटिपणी न करता मलाही निवडणूक लढवायची होती, असे पवार यावेळी म्हणाले.