ओतूर परिसरात कांद्यापेक्षा रोपच महागले; यंदा लागवडीत मोठी घट होणार

परतीच्या पावसाचा फटका
Onion Price
Onion Price: कांद्याने पुन्हा रडवले; जुना कांदा 80 रुपयांवरfile photo
Published on: 
Updated on: 

अवघ्या अणे, माळशेज पट्ट्यात दरवर्षी उत्पादित होणारा व दर्जेदार म्हणून राज्याबाहेरही ‘ओतूर कांदा’ नावाने ओळख असलेल्या कांद्याचे यंदा रोपांअभावी उत्पादन घटण्याची शक्यता स्थानिक शेतकर्‍यांनी वर्तवली आहे. रोपांच्या तुटवड्यासोबतच निवडणुकीची धामधूम, यामुळे मजुरांचाही तुटवडा जाणवत आहेत. त्यातच दुबार टाकलेली कांदा रोपे व बहुतांश शेतकर्‍यांकडे रोपांची उपलब्धता नसल्यामुळे यंदा कांदा उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

माळशेज पट्ट्यातील प्रामुख्याने ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी, ठिकेकरवाडी, धोलवड, हिवरे खुर्द, डिंगोरे, उदापूर, मांदारने, डुंबरवाडी, खामुंडी, पिंपरी पेंढार या गावांत मोठ्या प्रमाणात शेतकरी कांद्याचे पीक घेत असतात. त्यानुसार शेतकर्‍यांनी गेल्या महिना-दोन महिन्यांत बियाणे शेतात फेकले.

मात्र, याच काळात झालेल्या परतीच्या जोरदार पावसाने कांद्याच्या रोपांना तसेच पिकाला मोठा फटका बसला. पावसाने झोडपले गेल्याने रोपे, पीक भुईसपाट झाले. अनेकांच्या रोपांसह पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला. काहींचे रोपे उगवलीच नाहीत. त्यामुळे सद्य:स्थितीत कांदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा भासत आहे. जे रोप शिल्लक आहे, त्याचे भाव दुप्पट वाढल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकरी दिनेश गाढवे यांनी दिली.

एक एकरसाठी रोपे 35 ते 40 हजार रुपयांत

या वर्षी माळशेज परिसरातील शेतकर्‍यांकडून बाजारात येणार्‍या कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत 70 ते 80 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे बाजारात जुना कांदा प्रतिकिलो 70 ते 80 रुपये दराने विकला जात आहे. कांद्याच्या रोपांना कांद्यापेक्षा अधिक भाव आला आहे. एक एकर लागवड करण्यासाठी लागणार्‍या रोपांना 35 ते 40 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

यंदा 50 ते 60 टक्के इतकीच लागवड

सध्या माळशेज परिसरातील शेतकर्‍यांकडील उन्हाळी कांदा लागवड सुरू आहे. शेतकरी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची लागवड करतात. कांद्याच्या बियाणांपासून रोपे तयार करतात. रोपांची योग्य वाढ झाली की ते विक्रीही करतात. या वर्षी कित्येक शेतकर्‍यांचे टाकलेले रोप पाडाक झाले, तर काही शेतकर्‍यांची रोपे तरली आहेत. पावसाने ज्यांची रोपे नष्ट झाली आहेत त्यांना अतिरिक्त झालेली रोपे विक्री केली जात आहेत. रोपांची मागणी वाढल्याने या वर्षी या परिसरात 50 ते 60 टक्के इतकीच कांद्याची लागवड होईल, असा अंदाज आहे.

नोव्हेंबरअखेर कांद्याचे भाव स्थिर राहणार?

बाजारात कांद्याची आवक वाढली की कांद्याचे भाव पडतात. जेव्हा कांद्याची टंचाई निर्माण होते, तेव्हा भाव वाढतात. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांकडे कांदा उपलब्ध नसल्यामुळेच सध्या कांद्याला 70 ते 80 रुपये प्रतिकिलो भाव आहे, तर रोपांना एकरी 35 ते 45 हजार रुपये द्यावे लागत आहेत. कांद्यापेक्षा रोपांना अधिक भाव आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत कांद्याचे भाव स्थिर राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news