

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.23) दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर केला. यामध्ये दहावीचे 11 हजार 502 तर बारावीचे 19 हजार 217 विद्यार्थी उत्तीर्ण असून, गेल्यावर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाच्या तुलनेत यंदा दोन्ही परीक्षांच्या निकालात वाढ झाली.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांनी निकालाबाबतची माहिती दिली. राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत, तर बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. गुणपडताळणी, छायाप्रतीसाठी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे.
यंदा दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल 36.78 टक्के लागला. राज्यभरातून दहावीच्या 32 हजार 386 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 31 हजार 270 विद्यार्थ्यांपैकी 11 हजार 502 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात 35.89 टक्के मुले, तर 38.88 टक्के मुली आहेत. विभागीय मंडळनिहाय निकालामध्ये पुणे विभागातील 1 हजार 771 (28.60 टक्के), नागपूर 1409 (49.91 टक्के), छत्रपती संभाजीनगर 1683 (49.94 टक्के), मुंबई 2951 (27.76 टक्के), कोल्हापूर 631 (32.81 टक्के), अमरावती 651 (40.21 टक्के), नाशिक 1385 (52.06 टक्के), लातूर 944 (50.34 टक्के), तर कोकण विभागातील 77 (42.54 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल 6.92 टक्क्यांनी वाढला.
बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल 32.46 टक्के लागला. बारावीच्या 60 हजार 160 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 59 हजार 200 विद्यार्थ्यांपैकी 19 हजार 217 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विज्ञान शाखेचे 10 हजार 449 (52.52 टक्के) कला शाखेचे 4 हजार 893 ( 24.87 टक्के), वाणिज्य शाखेचे 3 हजार 430 (19.44 टक्के), व्यवसाय अभ्यासक्रमाचे 406 (21.61 टक्के), तर आयटीआयचे 39 (33.33 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये 30.76 टक्के मुले, तर 35.54 टक्के मुली आहेत. विभागीय मंडळनिहाय निकालात पुणे विभागातील 2792 (26.57 टक्के), नागपूर 2707 (40.54 टक्के), छत्रपती संभाजीनगर 1854 (47.95 टक्के), मुंबई 5929 (25.52 टक्के), कोल्हापूर 1360 (33.47 टक्के), अमरावती 1335 (42.59 टक्के), नाशिक 1343 (36.86 टक्के), लातूर 1816 (48.16 टक्के), तर कोकण विभागातील 81 (25.63 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल 0.33 टक्क्यांनी वााढला आहे. त्यामुळे यंदा दहावी-बारावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्णांचा टक्का थोडा का होईना वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.