

पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्जांसाठी 2 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत तब्बल 3 लाख 3 हजार 329 विद्यार्थ्यांचे अर्ज भरले आहेत.
एका जागेसाठी तीन अर्ज अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यंदा प्रवेशासाठी चांगलीच चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यायची का, यासंदर्भात सोमवारी निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येतो. आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते.
यंदा राज्यभरातील 8 हजार 863 शाळांमध्ये प्रवेशासाठी 1 लाख 9 हजार 111 जागा उपलब्ध झाल्या आहेत. या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी 14 ते 27 जानेवारीची पहिली मुदत तर 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी अशी दुसरी मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत यंदादेखील प्रवेश प्रक्रियेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारी नुसार, रविवारी सायंकाळपर्यंत 3 लाख 3 हजार 329 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. त्यात सर्वाधिक 61 हजार 232 अर्ज पुणे जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल नागपूर जिल्ह्यातून 29 हजार 852, ठाणे जिल्ह्यातून 25 हजार 619, नाशिक जिल्ह्यातून 17 हजार 278, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 16 हजार 601, मुंबईतून 13 हजार 179 अर्ज दाखल झाल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून, 48 शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या 268 जागांसाठी केवळ 176 अर्ज आल्याचे स्पष्ट झाले आहे.