साखर कारखान्यांचा या वर्षीचा गळीत हंगाम लांबणीवर पडणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गाची चिंता आणखीच वाढली आहे. या वर्षीचा शासन निर्णय हा 15 नोव्हेंबरनंतर कारखाने सुरू करण्याचा असल्याने सर्वच कारखान्यांची धुराडी ही उशिरा पेटणार आहेत. परिणामी कारखाना प्रशासनाची गळीत हंगामाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मोठी कसोटी लागणार आहे.
त्यातच दिवाळीचा सण व विधानसभा निवडणूक येत असल्याने साखर कारखाने सुरू करण्याबाबत हा निर्णय घेतल्याची माहिती एमआरएन भीमा शुगर प्रा. लि. संचालित पाटस कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने यावर्षीचा बॉयलर अग्नी प्रतिपादन व गव्हाणीमध्ये मोळी टाकण्याचा कार्यक्रम देखील कारखाना प्रशासन स्तरावर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी गाळपच्या बाबतीत साखर कारखानदारांना मोठी कसरत करावी लागली होती. यावर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण होईल असे दिसत आहे. कारण गुळ गुर्हाळ सुरू झाल्याने व त्यातच गळीत हंगाम लांबणीवर पडल्याने गुळ उत्पादक गुर्हाळांकडे ऊस उत्पादक शेतकरी वळला आहे.
गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील 19 साखर कारखान्यापैकी 3 साखर कारखाने हे गळीत हंगामासाठी बंद होते. यामध्ये दौंडमधील अनुराज शुगर्स साखर कारखाना, शिरूरमधील घोडगंगा साखर कारखाना व भोर येथील राजगड सहकारी साखर कारखाना हे गळीत हंगामासाठी चालू झाले नव्हते.
दौंड तालुक्यातील कार्यरत चार साखर कारखान्यांपैकी अनुराज शुगर्स हा कारखाना गेल्या वर्षी चालू झाला नसल्याने दौंड तालुक्यातील असलेले भीमा सहकारी साखर कारखानाचे गाळप 6 लाख 36 हजार 933 मेट्रीक टन इतके झाले तर दौंड शुगर्स साखर कारखानाचे गाळप 18 लाख 1 हजार 877 मेट्रीक टन गाळप झाले तर व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यांचे गाळप 5 लाख 95 हजार मेट्रीक टन झाले.
या तिन्ही कारखान्याचे गाळप 30 लाख 33 हजार 810 मे टन एवढे झाले. यावर्षी दौंड शुगर कारखान्याने 20 लाख मेट्रीक टन गाळप उद्दीष्ट समोर ठेवले असल्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी सांगितले आहे. तर भीमा पाटस 10 लाख मेट्रीक टन गाळप उद्दीष्ट ठेवले आहे.
खरी स्पर्धा 15 नोव्हेंबरनंतरच
सर्वच साखर कारखान्यांची गळीत हंगामाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्पर्धा 15 नोव्हेंबरनंतरच सुरू होणार आहे. मात्र उसाची स्पर्धा लक्षात घेता कारखान्यांनी वाहतुकीसाठी त्यांच्या स्तरावर कमिशन वाढ गेल्याच वर्षी केली होती. त्यामुळे गुर्हाळाला ऊस पुरवठा हा कमी झाला होता. यावर्षी देखील साखर कारखाने आपला समतोल कसा राखतात याकडे लक्ष वेधले गेले आहे.
बंद कारखान्यांमध्ये भर पडणार का?
मागील वर्षी जिल्ह्यातील 19 साखर कारखान्यांपैकी 3 साखर कारखाने सुरू झाले नव्हते. मात्र या हंगामाला बंद असलेले साखर कारखाने सुरू होणार की आणखी काही साखर कारखान्यांची बंद साखर कारखान्यामध्ये भर पडणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.