Mission Admission : अकरावी प्रवेशाला उतरती कळा ; यंदा 42 हजारांवर जागा रिक्तच

दहा फेर्‍या राबवूनही ; प्रवेश प्रक्रिया संपल्याचे शिक्षण विभागाकडून जाहीर
admission
अकरावी प्रवेशpudhari
Published on
Updated on

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत तब्बल दहा फेर्‍या राबविण्यात आल्या. संबंधित प्रवेश प्रक्रिया तब्बल पाच महिने चालली. तरीदेखील यंदा 42 हजारांवर जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अकरावी प्रवेशाला उतरती कळा लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

यंदा 343 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 20 हजार 805 जागा उपलब्ध आहेत. आत्तापर्यंत झालेल्या तीन नियमित, सहा विशेष फेर्‍या आणि एक पाच दिवसांची दैंनदिन प्रवेश फेरी, अशा दहा फेर्‍या राबविण्यात आल्या. या दहा फेर्‍या मिळून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून 69 हजार 218 विद्यार्थ्यांनी तर कोट्यातून 9 हजार 400 अशा एकूण 78 हजार 618 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर, केंद्रीभूत प्रवेशांच्या 34 हजार 942 आणि कोटा प्रवेशांच्या 7 हजार 245 अशा एकूण 42 हजार 187 जागा अखेर रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, यंदा 1 लाख 3 हजार 839 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली होती, तर 94 हजार 684 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले होते. त्यामुळे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 25 हजार 221 विद्यार्थ्यांनी देखील प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेली काही वर्षे 20 ते 25 हजार जागा रिक्त राहत होत्या. परंतु, गेल्या वर्षी 30 हजारांहून अधिक आणि यंदा 42 हजारांवर जागा रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकारी म्हणाले, शहरात अकरावी प्रवेशासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असून जेईई मेन्स, नीट, सीईटी आदी परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागातच शिकण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच, आयटीआय किंवा पॉलिटेक्निक प्रवेशाला विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेतील जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रिया संपल्यात जमा आहे. तरीदेखील काही तांत्रिक कारणास्तव काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सामावून घेतले जाईल. परंतु, यापुढे प्रवेशासाठी कोणतीही फेरी आयोजित केली जाणार नसल्याचे उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news