नरेंद्र साठे
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा संदेश आला. बँकेत गेले तर बँकवाले पैसे मिळणार नाही म्हणून सांगू लागले. तुमची थकबाकी आहे, म्हणून ते पैसे वळते करणार असल्याचेदेखील तिथल्या काही व्यक्तींनी सांगितलं,’ ही एका प्रातिनिधिक महिलेची प्रतिक्रिया. बँकांकडून लाडक्या बहिणींची ओवाळणीच काढून घेण्याचे प्रकार घडू लागलेत. थकीत कर्जाचे हप्ते, खाते बंद असल्याने शुल्क आकारले जात असल्याने, राज्य सरकारने महिलांच्या खात्यावर वर्ग केलेले तीन हजार रुपये त्यांना मिळेनासे झाले आहेत.
पुण्यातील बालेवाडीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला. पुण्यातच बहिणींच्या खात्यावरील पैसे काढता येत नसल्याचेदेखील प्रकार घडले आहेत. राज्यात इतर ठिकाणी असेच प्रकार घडत असून, काही ठिकाणी बँका विविध कारणांनी पैसे देत नसल्याने, खात्यावर जमा झालेले पैसे घेण्यासाठी आलेल्या महिलांची पदरी निराशा पडत आहे. तर दुसरीकडे बँकेतील पैसे काढून घेतले जातील या अफवेमुळे बँकांमध्ये महिला गर्दी करत आहेत.
अनेक महिलांचे बँकेत खाते आहे. मात्र, त्यांच्याकडून ते सतत वापरात येत नसल्याने त्यांच्या खात्यावर किमान रक्कमही शिल्लक राहिली नसल्याने बँकांकडून आकारण्यात येत असलेल्या शुल्काची रक्कम वाढत गेली. बँकेत आता योजनेचे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये आल्यानंतर बँकांनी त्यांचे शुल्क (चार्जेस) वजा करण्यास सुरुवात केली. तसेच, काही महिलांच्या नावे कर्ज आहेत. ही कर्ज थकली असल्यास महिलांच्या थकीत कर्जाच्या हप्त्यासाठीही हे पैसे बँकांनी वळते करण्यास सुरुवात केली, त्याबाबत महिलांनी प्रशासनाकडे तक्रारीदेखील केल्या आहेत.
बँकांकडून सुरू असलेल्या या प्रकारांची राज्याच्या महिला व बालविकास विभागाने गंभीर दखल घेऊन त्यांचे कान टोचले आहेत. योजनेतून हस्तांतरित केलेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित करू नका. तसेच, योजनेतून दिलेली ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून, ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये.
काही लाभार्थ्यांचे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले आहे. असे केले असल्यास ते बँक खाते तत्काळ सुरू करण्यात यावे. तसेच, योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना राज्यातील सर्व बँकांना शासनाने केल्या आहेत.
बँकेचे खाते काही काळ वापरात नसल्यास (डॉरमंट), नंतर खात्यावर आलेल्या पैशांतून शुल्क, दंड वसूल केला जातो. बँकांनी हे करू नये, म्हणून त्यांना सूचना केल्या आहेत. काहींनी गैरसमज पसरवले आहेत की, बँकांनी संदेश पाठवला. परंतु, पैसे आले नाहीत. परंतु, हे चुकीचे आहे, बँकेत पैसे जमा झाल्याशिवाय कुणालाही संदेश येणार नाही.
- जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., पुणे