

पुणे: राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली असून रविवारी सर्वत्र उन्हाचा दाह चांगलाच जाणवला. राज्याचा सरासरी पारा 37 ते 38 अंशांवर गेला आहे. संपूर्ण देशात इतके तापमान फक्त महाराष्ट्रात आहे. त्या पाठोपाठ आंध्र प्रदेशमध्ये आहे. उर्वरित देशात मात्र सरासरी पारा 36 अंशांवर आहे. महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर, जळगाव, अकोला, यवतमाळ हे जिल्हे उष्णतेच्या लाटेचे हॉटस्पॉट ठरले आहेत.
अकोला, सोलापूर, सांगली येथील पारा 39 अंशावर गेला; तर पुणे, जळगावसह इतर भागांतील तापमान 38 अंशांवर गेले होते. राज्यात यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उष्णतेची लाट आली असून हा तडाखा मंगळवारपर्यंत राहणार आहे. रविवारी राज्यात
सर्वत्र अंगाची काहिली करणारे ऊन जाणवत होते. त्यामुळे रविवार असूनही सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत रस्त्यावरची रहदारी कमी झाली होती. राज्याचा सरासरी पारा 37 ते 38 अंशांवर होता. दरम्यान, उष्माघाताचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, उन्हात बाहेर पडताना टोपी, स्कार्फ घालावा. अतिथंड पदार्थ टाळावेत, चक्कर येणे, शरीरातील पाणी कमी झाल्याने अशक्तपणा येणे अशी लक्षणे जाणविल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
थंड हवेचे महाबळेश्वर, माथेरान तापले
राज्यात शनिवारपासून उष्णतेची लाट सक्रिय झाली. रविवारी या लाटेने कहर केला. राज्यातील सर्वात थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरचा पारा 33.2, तर माथेरानचा पारा 34.6 अंशांवर गेला होता. यंदाच्या मार्चमध्ये या दोन्ही थंड हवेच्या ठिकाणांचे कमाल तापमान 30 अंशांवर गेले आहे.
उष्माघाताचे 4 रुग्ण
मार्चमध्ये आतापर्यंत उष्माघाताच्या चार रुग्णांची नोंद झाली असल्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गेल्यावर्षी 347 रुग्ण आढळले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी 1 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 41 होती. यंदा रुग्णसंख्या कमी आहे.