

पुणे: स्वारगेट एसटी स्थानकातील एसटी बसमध्ये परवा सकाळी घडलेल्या बलात्काराच्या घटनेत संंबंधित तरुणीकडून प्रखर विरोध झाल्याचे दिसत नाही, असा दावा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.
स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या या निंद्य प्रकाराचे पडसाद राज्यभर उमटल्याच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी स्वारगेट एसटी स्टँडला भेट देऊन एसटी बसची पाहणी केली. या वेळी भूमाता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केल्याने कोणाशीही न बोलता ते थेट पोलिस आयुक्त कार्यालयात गेले. तेथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपले हे मत व्यक्त केले.
ते म्हणाले की, संबंधित तरुणीने पूर्ण ताकदीनिशी या प्रकाराचा प्रतिकार केलेला दिसत नाही. त्यामुळेच हा प्रकार घडत असताना बसच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या दहा- पंधरा प्रवाशांपैकी कोणालाही बसमध्ये काही अनुचित घडते आहे, याची कल्पना आली नाही. त्यामुळेच आरोपीला निर्धास्तपणे गुन्हा करता आला.
...म्हणूनच पोलिसांनी पाळली गुप्तता
घटनेचे वृत्त प्रसारित झाले असते तर आरोपी दूरवर पळून जाण्याची शक्यता होती, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. घटना घडली त्या रात्री पोलिसांनी या परिसरात गस्त घातली का, याचीही माहिती आपण घेतली. रात्री दीड वाजता आणि पहाटे तीन वाजता पोलिस निरीक्षकांनी या परिसराची पाहणी केली, असे त्यातून पुढे आले आहे. जे गुन्हेगार ग्रामीण भागातून शहरात येतात, त्यांची माहिती शहर पोलिसांना नसते. तथापि, यापुढे अशी माहितीही शहर पोलिसांना उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सुधारणा करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.