पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मराठी रंगभूमी प्रगल्भ आणि विविधतेने नटलेली आहे. नाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रंगभूमीचा अधिक विकास होईल. देशपातळीवरील उत्तम कलाकारांच्या माध्यमातून विद्यापीठातून नाट्यकलेचे प्रशिक्षण आणि संशोधन व्हावे, अशी अपेक्षा 100 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले आहे. 99 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याकडून अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ.जब्बार पटेल बोलत होते. डॉ.जब्बार पटेल म्हणाले, माझ्या आजवरच्या प्रवासात अनेक दिग्गजांचे योगदान आहे. नाट्यसृष्टीचे अनेक प्रश्न आहेत.
आज प्रामुख्याने मी नाटकात येऊ इच्छित असलेल्या मुलांसाठीचा महत्त्वपूर्ण विषय मांडत आहे. राज्याच्या प्रत्येक विद्यापीठात नाट्य विभाग आहे. मात्र, त्यांना त्यासाठीचा खर्च त्यांनीच उभा करायचा आहे, हा खर्च 5 ते 7 कोटी रुपयांचा आहे, प्रत्येक विद्यापीठाला तो झेपावणारा नाही. यामुळे राज्य सरकारने प्रत्येक विद्यापीठाच्या नाट्य विभागाला अनुदान दिले पाहिजे. विद्यापीठात सादर होणार्या विद्यार्थ्यांच्या नाटकांना सेन्सॉरशिप लावू नये. त्यांना व्यक्त होऊ द्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मावळते नाट्य संमेलनाअध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी यावेळी विविध मागण्या मांडल्या. तसेच, नाट्य संमेलनाअध्यक्षांना मिळणारा निधी कमी आहे. तो वाढून मिळावा, त्याचप्रमाणे नाट्य परिषदेच्या कार्यालयात नाट्य संमेलनाअध्यक्षांना वेगळे दालन व्हावे, अशी मागणीही केली.
हेही वाचा