पुणे: बेरोजगार तरुण, युवकांचे प्रश्न, महिला सुरक्षा, शेतकर्यांच्या समस्येसह सामाजिक शांतता आणि सौहार्द यांसारख्या विषयांवर सरकारला जाग आणण्यासाठी युवक काँग्रेसकडून पुण्याहून मुंबईतील विधानभवनाकडे निघालेल्या युवा आक्रोश पदयात्रा पोलिसांनी अडविली. शिवाजीनगर भागात पोलिसांनी अडवल्यानंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली लालमहल, पुणे ते मुंबई विधानभवनाकडे ’युवा आक्रोश’ पदयात्रा काढण्यात आली. बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांना न्याय मिळावा, महिलांना सुरक्षित वाटावे, शेतकर्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन मिळावे, तसेच राज्यात सामाजिक एकता आणि शांततेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, या प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेसने ही पदयात्रा सुरू केली होती. मात्र, पोलिसांनी ही यात्रा थांबवून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, अध्यक्ष कुणाल राऊत, कार्याध्यक्ष शिवराज मोरे, सह प्रभारी एहसान खान, बंटी शेळके, सोनललक्ष्मी घाग, प्रशांत ओगले, श्रीनिवास नालमवार, वैष्णवी किराड, मीडिया अध्यक्ष अक्षय जैन, अजित सिंह, विजय चौधरी, प्रथमेश आबनावे, ऋत्विक धनवट, अमोल दौंडकर, सौरभ अमराळे, महेश टावरे, चंद्रशेखर जाधव, उमेश पवार, कौस्तुभ नवले, राहुल शिरसाट आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.