मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कापून घेऊ नयेत म्हणून शासनाच्या वतीने वारंवार सांगण्यात आले. परंतु, काही बँकांकडून त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. अजूनही योजनेचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या महिलांना बँककडून चार्जेस कट करून घेतले जाणार असल्याचेच सांगण्यात येत आहे.
याबाबत शासनाकडून सतत सांगण्यात येऊन देखील बँकांकडून पैसे कट करून घेण्याच्या प्रकारामुळे निकिता आदित्य हेंद्रे यांनी महिला बाल व विकासमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. योजनेचे जमा झालेले पैसे बँकांनी परस्पर विविध कारणे देऊन कट केले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी होत आहे. महिलांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. सरकारकडून दिलेल्या आदेशाकडे बँकांकडून दुर्लक्ष केले जात असून, अर्ज भरताना महिलांनी बँक खात्याच्या दिलेल्या क्रमांकाऐवजी जुन्या चालू नसलेल्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, असेही अनुभव सांगण्यात आले.
पद्मावती येथील एका बँक शाखेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या कल्पना जगताप यांना विविध चार्जेस असल्याने पैसे कट झाल्याचे सांगण्यात आले. त्या म्हणातात, माझे झिरो बॅलेन्स खाते, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने बँकेत व्यवहार होत नाहीत. पैसे आल्यानंतर मात्र बँक आता पैसे कट करीत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट या महिन्यांच्या तीन हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र, लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होताच अनेकांना काढता येईनाशी झाली. तर कमीत कमी रक्कम खात्यात शिल्लक असावी, या अटीचे पालन करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या रकमेतून बँकेने रक्कम कापण्यास सुरुवात केली. तसेच काहींनी दंडात्मक स्वरूपाची रक्कम, तर काही बँकांनी थकीत कर्जाचे हप्ते म्हणून रक्कम वसूल केली आहे. या तक्रारींची दखल घेऊन महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी बँकांना कोणत्याही कारणास्तव रकमा कापू नका, अशा शब्दांत सुनावणारे पत्र यापूर्वीच पाठवून सूचना दिल्या होत्या. मात्र, या तक्रारीवरून पुन्हा सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.