

Pune News: महापालिकेकडून पुणेकरांना केल्या जाणार्या पाणीपुरवठ्यावर आता जलसंपदा विभागाला नियंत्रण ठेवायचे आहे. मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा महापालिका अतिरिक्त पाण्याचा वापर करीत असल्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ताशेरे ओढल्यानंतर खडकवासला धरणाखालील पंपगृहाचे नियंत्रण जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने थेट महापालिकेला केली आहे. त्यावर आता महापालिका काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे शहराला खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा होतो. पाटबंधारे विभागाने त्यासाठी गतवर्षी महापालिकेला लोकसंख्येनुसार 12.42 टीएमसी इतका पाणीसाठा मंजूर केला आहे. मात्र, महापालिकेकडून प्रत्यक्षात 21 टीएमसी इतके पाणी उचलण्यात आले आहे.
पाण्याच्या या अतिरिक्त वापराबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेवर ताशेरे ओढले होते. तसेच, पाण्याचा हा अतिरिक्त वापर कमी करण्याचे आदेशही दिले होते. त्यासाठी प्रामुख्याने वितरण व्यवस्थेतील गळती रोखण्याबरोबरच पाणी मीटर बसवून त्यानुसार पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कान टोचल्यानंतर आता पाटबंधारे विभागानेच महापालिकेचा अतिरिक्त पाणीपुरवठा रोखण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे. त्यासाठी खडकवासला धरणाखालील ज्या पंपगृहातून शहरासाठी पाणी सोडले जाते, त्याचेच नियंत्रण जलसंपदा विभागाला देण्याची सूचना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने महापालिकेला पत्राद्वारे केली आहे.
तसेच, पंपगृहात नक्की किती पाणी सोडले जाते, हे तपासण्यासाठी बसविण्यात आलेले मीटर सद्य:स्थितीला बंद असून, तेही तातडीने दुरुस्त करावे, असेही पाटबंधारे विभागाने महापालिकेला कळविले आहे.