पुणे: शहरात आता महापालिकेकडून मीटरद्वारे पाणीपट्टीचे बिल आकारले जाणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठा विभागास दिले आहेत. त्यामुळे आता पुणेकरांना ज्या प्रमाणात पाण्याचा वापर त्या प्रमाणात बिल भरावे लागणार आहे.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेने शहरात पाणी मीटर बसविण्याचे काम हाती घेतले आहे. या योजनेअंतर्गत शहरातील स्वतंत्र घरे तसेच निवासी सोसायट्यांना पाणीमीटर बसविण्यात येत आहेत.
तब्बल 2 लाख 82 हजार पाणी मीटर बसविण्यात येणार असून, त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. झोननुसार हे मीटर बसविण्याचे काम सुरू असून, काही झोनमध्ये 90 टक्के पाणी मीटर बसविण्यात आले आहे. त्या ठिकाणी आता मीटरच्या माध्यमातून बिलाची आकारणी केली जाणार आहे.
मीटरद्वारे पाणीपट्टी आकारताना महापालिका 1 हजार लिटर पाण्यासाठी साडेसात रुपये शुल्क आकारणार आहे. म्हणजेच, एखाद्या घरात सहा ते सात व्यक्ती असल्यास त्यांना दररोज निकषानुसार पाणी घेतल्यास अवघे साडेसात रुपयांचे पाणी बिल महापालिकेस द्यावे लागणार आहे.
तसेच, निकषापेक्षा जास्त पाणी घेतल्यास जादा पैसे मोजावे लागणार आहेत. परिणामी, पाण्याचे बिल अधिक आल्यास नागरिक पाण्याचा वापर कमी करतील, असे महापालिकेचे म्हणणे आहे. मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्यात येणार्या झोनमधील नागरिकांच्या मिळकतकरातील पाणीपट्टी मीटरने बिल आकारणी सुरू झाल्यानंतर तत्काळ रद्द केली जाणार आहे.
पाण्याच्या वापरास बसणार आळा
महापालिकेने ज्या झोनमध्ये पाणी मीटर बसविले आहेत, तेथील पाणीपुरवठ्याची मोजणी केली असता अनेक ठिकाणी प्रतिव्यक्ती 500 ते 800 लिटर प्रतिदिन वापर असल्याचे समोर आले होते. प्रत्यक्षात या योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती 135 लीटर पाणी वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे निकषापेक्षा जास्त पाणी वापर होत असल्याने तो कमी करण्यासाठी मीटरद्वारे पाणीपट्टी आकारली जाणार आहे.
मोठ्या सोसायट्यांतील नागरिकांना मिळकतकरात पाणीपट्टी भरावी लागते तसेच जादा पाण्यासाठी टँकरसाठीही पैसे मोजावे लागतात. परिणामी, सोसायटींचा मेंटेनन्स खर्च वाढतो. उदाहरणार्थ : एखाद्या सोसायटीत एक हजार नागरिक राहत असतील, तर त्यांना नियमानुसार दररोज 1 लाख 35 हजार लिटर पाणी मिळेल. हे पाणी एक हजार लिटरला साडेसात रुपये याप्रमाणे बिल आकारल्यास दिवसाला अवघे 1 हजार ते 1100 रुपये मोजावे लागतील.