

पुणे: स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणातील पीडितेने प्रधान सचिव विधी व न्याय विभागाला तक्रारवजा पत्र लिहिले आहे. यामध्ये आरोपीने तिसर्यांदा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तसेच, सरकारी वकील देताना तिला विचारात घेतले गेले नसल्याचा आरोपही केला आहे, तर पोलिसांच्या कामकाजावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.
पीडितेने पत्रात म्हटले आहे की, तिसर्यांदा अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी तीव्र विरोध केल्याने त्याला ते शक्य झाले नाही. या वेळी माझा आवाज खोल गेल्याने आवाज निघतच नव्हता. शिवाय त्या वेळी माझ्या मनात बलात्काराच्या विविध घटनांत झालेल्या हत्यांच्या गोष्टी असल्याने मी जीव वाचविणे योग्य समजले.
तसेच नियुक्त केलेल्या सरकारी वकिलांबद्दल आत्ताच मला काही आक्षेप घ्यायचा नाही. त्यांच्यावर आक्षेप घेता येईल, अशी माहिती असल्याचा दावा तिने पत्रात केला आहे. तर, आपण विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. असिम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी तुला यायला एक दिवस उशीर झाला, असे सांगितले. याचा अर्थ अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही का? असा सवालही तिने पत्रात केला आहे.
पीडितेच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली नाही.
आयुक्तांनी फास्ट ट्रॅकमध्ये केस चालविण्याचे म्हटले असूनही आरोपपत्र दाखल नाही.
पोलिसांनी माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून ‘तू ओरडली का नाहीस?’ असा प्रश्न विचारला.
मी आवाज दिला. पण, माझ्या जिवाला धोका असल्याचे लक्षात आले.
माझा जबाब पुरुष पोलिस अधिकार्याने घेतला.
मेडिकल परीक्षण पुरुष डॉक्टरने केले.
मला माझे वकील नेमण्याचा अधिकार असताना पोलिसांनी माझ्या अधिकाराचा काहीही विचार केला नाही.
पोलिस अधिकार्यांनी मला तीन वकिलांची नावे सांगितली. त्यातील वकील निवडण्यास सांगितले.
आरोपीचे वकील जेव्हा पीडितेवर आरोप करत होते तेव्हा अॅड. सरोदे यांनी तिच्या बाजूने साथ दिली.
पोलिसांकडून जी वागणूक मिळाली ती वेदनादायी होती.