

Pune: विधानपरिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादबा वाघ (वय 55) यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत अपहरणकर्त्यांनी गाडीतच त्यांचा खून केला. त्यानंतर वाघ यांचा मृतदेह सिंदवणे घाटात टाकून आरोपींनी पळ काढला होता. दरम्यान, अवघ्या 36 तासांच्या आत पोलिसांनी गुन्ह्यांचा छडा लावत दोन संशयितांना पकडले असून, त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे.
पवन शर्मा (रा. धुळे ) आणि नवनाथ गुरसाळे (रा. फुरसुंगी ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तर त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. वाघ यांचा खून खंडणीसाठी करण्यात आलेला नाही. तो खून अन्य कारणातून सुपारी देऊन केल्याची प्राथमिक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, हा खून नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत सखोल तपास केल्यानंतरच बोलता येईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सांगितले.
सोमवारी (दि.9) सकाळी सव्वासहाच्या सुमारास वाघ यांचे मॉर्निंग वॉकच्या वेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी अपहरण केले होते. याप्रकरणी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघ (वय 27) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघ यांच्या अपहरणाची बातमी कळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला होता.
मात्र, वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटातच आरोपींनी त्यांचा गाडीत खून केला. वाघ यांच्यावर चाकूने वार करण्यात आले असून, लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी त्यांना सिंदवणे घाटातील निर्जनस्थळी टाकून पळ काढला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना मिळून आला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली होती.
पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध
आरोपींनी वाघ यांचे अपहरण केल्यानंतर काही मिनिटांत त्यांचा गाडीतच खून केला. पोलिसांना अपहरणाची माहिती मिळताच, वाघ यांच्या सुटकेसाठी काही वेळात तब्बल 400 ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेर्याचा डेटा गोळा केला. अपहरण करण्यासाठी वापरलेल्या गाडीशी साधर्म्य अलेल्या 500 मोटारी तपासल्या. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची 20 पथके तयार करण्यात आली.
अपहरणकर्त्यांचा माग आम्हाला मिळाला होता. त्यानुसार तपासाला गती देण्यात आली. सर्व शक्यता गृहीत धरून आमचा तपास सुरू होता. परंतु अपहरकर्त्यांनी कोणतीच मागणी न करता गाडीतच वाघ यांचा खून केला. हा प्रकार काही सराईत गुन्हेगारीचा नाही. एखाद्या गुन्हेगारी टोळीने खंडणी मागितलेली देखील नाही, तर दोन गुन्हेगारी टोळ्यातील संघर्षाचा देखील हा प्रकार नाही. त्यामुळे याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाईचा कोणताही प्रश्न नाही.
पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सक्षम असून, सदैव कटिबद्ध आहोत. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस तत्परतेने काम करतात. खून नेमक्या कोणत्या कारणासाठी केला, याची स्पष्टता अजून झाली नाही, अशीही माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
टिळेकरांनी दाखवला पोलीस यंत्रणेवर विश्वास
या प्रकरणानंतर टिळेकर यांनी पुणे पोलिसांवर विश्वास दाखवत घटनेचे राजकारण न करता पोलिसांची बाजू समजावून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा सुगावा लावतील, सध्या आमचे कुटुंब खुप दु:खात आहे. आमदाराचा मामा असो किंवा सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती.
प्रत्येकाला आपल्या कुटुंबात अशी घटना घडल्यावर आघात होतो. त्यावेळेस राजकारण न करता पोलिसांची बाजू समजावून घेणे आवश्यक आहे. त्यांना आमचा परिवार पूर्ण सहकार्य करतोय, त्यांच्यावर आमची कोणतीही शंका नाही. पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.