Ashadhi wari 2024|वैष्णवांच्या सेवेसाठी यंत्रणा सज्ज

Ashadhi wari 2024
वैष्णवांच्या सेवेसाठी यंत्रणा सज्जFile Photo

पुणे : पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी तयारी पूर्ण झाली असून, काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. यावर्षी राज्य सरकारकडून मागणी केलेल्या निधीतील ७५ टक्के निधी अगोदरच मिळाला आहे. त्यातून कामांना वेग आला असून, दोन प्रमुख पालखी सोहळ्यांसह इतर पालखी सोहळ्यांसाठी १९२ पाण्याचे टँकर, ३ हजार २५० शौचालये, १२ निवारा केंद्र, महिलांसाठी हिरकणी कक्ष, १७९ रुग्णवाहिका, सुमारे १५० आरोग्यदूत, तीन हजार प्रथमोपचार किट, त्याचबरोबर सफाईचे काटेकोर नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी, तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी प्रस्थान ठेवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची तयारी पूर्ण झाली आहे, असे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, तसेच संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

पाटील म्हणाले, यावर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम कदमवाकवस्ती येथील नवीन जागेत होत आहे. शासनाकडून या जागेच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाख निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, गतवर्षी नियोजन करण्यामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या, या वर्षी त्या कटाक्षाने दूर केल्या आहेत. तसेच, काही सूचना आल्या होत्या त्यानुसार आम्ही बदलदेखील केले आहेत. अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

टँकरच्या नियोजनासाठी साडेचारशे कर्मचारी

वारकऱ्यांना पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी १९२ टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एखाद्या टँकरमधील पाणी संपले, तर तो टँकर पाणी भरण्यासाठी जातो त्या वेळी पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी दोन्ही पालख्यांबरोबर चार टैंकर फिरते राहणार आहेत. त्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. टैंकर नियोजनासाठी ४४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

महिलांसाठी हिरकणी कक्षाची सुविधा

निवारा केंद्रांसह गतवर्षीप्रमाणे वारीमध्येही महिलांसाठी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे. यामध्येदेखील वैद्यकीय पथक, पिण्याचे पाणी, शौचालयाची सुविधा, स्तनदा माता व बालकांसाठी विश्राम व्यवस्था, बालकांसाठी खेळणी, बंदिस्त मंडप असणार आहे.

निवारा केंद्रात काय असणार?

जिल्हा परिषदेने वारकऱ्यांसाठी निवारा केंद्राचीही उभारणी केली आहे. या केंद्रामध्ये आरोग्य पथकही असणार आहे. कोणाला त्रास जाणवल्यास तत्काळ त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येणार आहेत. पालखी मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी निवारा केंद्र असतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news