

राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका सुरू आहे. राज्यात बुधवारी सर्वात कमी 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जळगाव येथे झाली. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हिमालयीन भागात सध्या पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव चांगलाच वाढला आहे. परिणामी, उत्तर भारतातील बहुतांश राज्यांत अतितीव्र थंडीचा कडाका वाढला आहे. ईशान्य भारतातील राज्यातही बर्फवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. या भागाकडून राज्याकडे सध्या थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका सुरू आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरापासून अगदी तामिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही भागांत ढगाळ वातावरण तयार होईल, तर सकाळी दाट धुके पडले, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे