जागतिक श्रवण दिन विशेष: गेमिंग हेडफोनचा नाद घालतोय बहिरेपणाला साद

मुलांमधील गॅजेटचा वापर मर्यादेबाहेर गेला आहे.
World Hearing Day Special
जागतिक श्रवण दिन विशेष: गेमिंग हेडफोनचा नाद घालतोय बहिरेपणाला साद Pudhari
Published on
Updated on

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: ‘अरे शौर्य, ऐकतोस का? दुकानातून थोडं सामान आणून देतोस का?’...आईने चारदा हाका मारूनही अकरा वर्षांच्या शौर्यला ऐकू गेले नाही. कानावर गेमिंग हेड फोन लावून प्ले-स्टेशनवर गेम खेळण्यात तो मग्न होता...आईने वैतागून त्याच्या कानावरचे हेडफोन काढून घेतले.

आईचा त्याला इतका राग आला की त्याने आरडाओरडा केला आणि आपल्या खोलीचे दार जोरात लावून घेतले. सतत हेडफोनचा वापर, एकलकोंडेपणा, वाढती चिडचिड असा त्याचा दिनक्रम आईच्या डोळ्यांसमोर तरळला आणि ती हतबल झाली. सध्या बर्‍याच घरांमध्ये थोड्याफार फरकाने हेच चित्र पाहायला मिळत आहे.

मुलांमधील गॅजेटचा वापर मर्यादेबाहेर गेला आहे. मोबाईलवर गेम खेळताना, यूट्यूबवरील व्हिडिओ पाहताना, रिल्स आणि शॉट्स पाहताना मुलांना हेडफोन वापरायची वाईट सवय लागली आहे. अलीकडे प्ले स्टेशनचे फॅडही वाढले आहे. सतत हेडफोन, इयरफोन कानात असल्याने मुलांच्या श्रवणशक्तीवर विपरीत परिणाम होत आहेत.

कानांवर मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आणि जास्त कालावधीपर्यंत आवाजाचा मारा होत आहे. ’हेडफोनचा नाद घालतोय बहिरेपणाला साद’ असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांच्या कानांचे पडदे नाजूक असतात. त्यामुळे जास्त डेसिबलचा आवाज त्यांच्या कानांना सहन होत नाही. आजच्या काळातील पोर्टेबल ऑडिओ डिव्हाइसचा आवाज 120 डेसिबल इतका असू शकतो.

या पातळीवर सातत्याने आवाज ऐकल्याने मुलांची श्रवणशक्ती अत्यंत कमी कालावधीत खराब होऊ शकते. 85 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या संपर्कात आल्याने सुमारे 20 टक्के लोकांच्या कानाचे नुकसान होते. तर 100 डेसिबलच्या पुढे आवाज असल्यास कानाच्या पडद्यावर गंभीर परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांमध्ये कानाच्या आतील पेशी आणि श्रवण क्षमतेला हानी होऊ शकते. कानात वेदना, सूज, अस्वस्थता आणि कानातून आवाज येण्याची शक्यता असते.

हेडफोन वापरामुळे होणारे परिणाम

  • तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा

  • बाहेरचा आवाज सहन करण्याची क्षमता कमी होणे

  • एकलकोंडेपणा, चिडचिड, नैराश्य

  • संवादकौशल्य कमी होणे

  • अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार, 5 पैकी 1 किशोरवयीन मुलाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा श्रवणशक्ती कमी होण्याची समस्या उद्भवत आहेत. हा दर 20 वर्षांपूर्वीच्या तुलनेत सुमारे 30% जास्त आहे. हेडफोन्सच्या वाढत्या वापरामुळे ही वाढ झाली आहे.

उपाय काय ?

  • मुलांना स्क्रीन टाइम ठरवून द्यावा.

  • आठवड्यातून एकदा अर्धा तास हेडफोन वापरण्याची मुभा द्यावी

  • मोबाईलच्या सवयीतून बाहेर काढून गप्पा मारण्याचा प्रयत्न करा.

  • आवडीचे खेळ खेळा, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला घेऊन जा.

आपल्या कानाची क्षमता केवळ नैसर्गिक आवाज ऐकण्याचीच असते. मर्यादेहून जास्त मोठा आवाज कानांना सहन होत नाही आणि बहिरेपणा येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या श्रवणशक्तीबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. एखाद्याला ऐकू येत नसेल आणि श्रवणशक्ती कमी झाल्यास त्वरित श्रवण चाचणी करणे गरजेचे आहे. कानाचे नुकसान टाळण्यासाठी, मोठ्या आवाजापासून लांब राहा किंवा ब्रेक घ्या. मुलांना कर्णकर्कश आवाजापासून परावृत्त करा.

- डॉ. अनिकेत देशमुख, कान-नाक-घसातज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news