पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात महिलेच्या उपचारांबाबतीत काय हलगर्जीपणा झाला, याबाबतच्या चौकशीसाठी तीन समित्या स्थापना केल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून संबंधित प्रकरणाचा अहवाल 24 तासांत सादर केला. मात्र, धर्मादाय आयुक्त समिती आणि मातामृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल अद्याप सादर न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व घटनेची चौकशी करण्यासाठी पुणे धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 4 एप्रिल रोजी चौकशी समिती गठित करण्याचे आदेश दिले. यामध्ये उपसचिव यमुना जाधव, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय समूहाचे अधीक्षक या सदस्यांचा समावेश आहे.
विधी व न्याय विभागाचे उपसचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीची बैठक झाली असून, त्यांनी चौकशी अहवाल अद्याप शासनाला सादर केला नसल्याची माहिती पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी दिली.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेला साडेपाच तास उपचारांविना ताटकळत ठेवले, असा ठपका आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने ठेवला आहे. याबाबतचा अहवाल सोमवारी (दि.7) राज्य महिला आयोगाला सादर केला. त्यानंतर धर्मादाय आयुक्तालयाच्या समितीचा आणि महापालिकेच्या मातामृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आल्यावरच कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेच्या मातामृत्यू अन्वेषण समितीची बैठक झाली असली तरी अहवाल अद्याप तयार झालेला नाही. प्रसूतीदरम्यान कोणत्याही मातेचा मृत्यू झाल्यास तो मृत्यू का झाला, त्याची कारणे शोधण्यासाठी मातामृत्यूचे विश्लेषण केले जाते. विश्लेषण समितीद्वारे शनिवारी (दि.5) केले. ही समिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित केली आहे. हे दोन्ही अहवाल आल्यावरच याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.