पुणे: ‘बार्टी’च्या शहरातील मुख्य कार्यालयासह राज्यात विविध विभागांत असलेल्या कार्यालयांत बाह्यस्रोताद्वारे कार्यरत असलेल्या सुमारे बाराशे कर्मचार्यांना गेल्या दहा वर्षांपासून वेतनवाढ देण्यात आलेली नाही.
त्यामुळे वेतनवाढ मिळावी, या मागणीसाठी या कर्मचार्यांनी सुरू केलेले बेमुदत आंदोलन शुक्रवारी (दि. 14) मागे घेण्यात आले. वाढीव मानधनाबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती कर्मचार्यांच्या वतीने देण्यात आली.
‘बार्टी’ कार्यालयात बाह्यस्रोताद्वारे सुमारे बाराशे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये वाहनचालक, कार्यालय सहायक, डेटा एंट्री ऑपरेटर, आस्थापना सहायक, संशोधन अधिकरी, प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, समतादूत, तालुका समन्वयक अशा विविध पदांवर कार्यरत आहेत.
यामध्ये बार्टी मुख्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, मुक्तिभूमी येवला, बार्टी विभागीय कार्यालय नागपूर, त्याचबरोबर सर्व जिल्हा जातपडताळणी समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचा समावेश आहे.
सद्य:स्थितीत कार्यरत असलेले सर्व कर्मचारी स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. (पूर्वीची ब्रिक्स इंडिया प्रा. लि.) या कंपनीच्या अंतर्गत कार्यरत आहेत. वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्याचे समाजकल्याणमंत्री संजय शिरसट यांना या कर्मचार्यांनी अनेकवेळा निवेदने दिली. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्मचार्यांनी आंदोलन सुरू केले होते.
‘बार्टी’ संस्थेतील बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचार्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत समाजकल्याणमंत्री आणि समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव यांच्यासोबत दूरध्वनीवरून शुक्रवारी (दि. 14) चर्चा करण्यात आली. त्यानुसार फेब्रुवारीचे वेतन मार्चमध्ये वाढीव मानधनासह देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
शासनाकडे मानधनवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे ‘काम बंद’ आंदोलन मागे घेण्याचे लेखी आवाहन महासंचालक सुनील वारे यांनी केले. लेखी आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे कंत्राटी कर्मचार्यांनी सांगितले.