

सुवर्णा चव्हाण
पुणे: उशिरा का होईना जिल्हास्तरीय ज्येष्ठ कलावंत मानधन समिती गठित करण्यात आली अन् आता ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनासाठीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच मानधनासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार मानधनासाठी नव्याने 528 अर्ज समितीकडे आले आहेत. पुढील आठवड्यात या नवीन अर्जांची छाननी होऊन त्यातील सुमारे शंभर ज्येष्ठ कलावंतांना मानधन मिळणार आहे.
मध्यंतरी प्रत्येक ज्येष्ठ कलावंताला 5 हजार रुपये दर महिन्याला मानधन दिले जाणार, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्याप्रमाणे आता जुन्या आणि नव्याने अर्ज केलेले असे मिळून पुणे जिल्ह्यातील अंदाजे 2 ते अडीच हजार कलावंतांना आता दरमहा पाच हजार मानधन दिले जाणार आहे.
ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनाचा विषय नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. मध्यंतरी पुण्यात जिल्हास्तरीय ज्येष्ठ कलावंत मानधन समितीच अस्तित्वात नसल्याने मानधनासाठीचे कामकाज बराच काळ रखडले होते. पण, काही महिन्यांपूर्वी नवीन समिती गठित करण्यात आली असून, सुरेश धोत्रे हे समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीकडून मानधनासाठीच्या नवीन अर्जांच्या छाननीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
याविषयी समितीचे सदस्य कौस्तुभ कुलकर्णी म्हणाले, यंदा मानधनासाठी नव्याने अर्ज करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. विविध कलावंतांनी मानधनासाठी नव्याने अर्ज केले. त्यातील 528 कलावंतांनी ऑनलाइन अर्ज पूर्णपणे भरले, तर 118 कलावंतांनी अर्धवट माहिती भरल्याने त्यांचे अर्ज रद्द झाले. आता पुढील प्रक्रिया म्हणून 528 कलावंतांच्या अर्जांची छाननी होणार आहे.
पुढील आठवड्यात कलावंतांशी चर्चा करून आणि त्यांच्या अर्जांची पाहणी करून त्यातील 100 कलावंतांची मानधनासाठी निवड केली जाणार आहे. त्यामुळे आता समितीकडे मानधनासाठीचे कोणतेही नवीन अर्ज प्रलंबित नाहीत. त्याशिवाय ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले गेल्याने याची नोंद समितीकडे आणि सरकारकडेही होत आहे. त्यामुळे कलावंतांची नोंदणी योग्यरीत्या होत आहे.
सरसकट मानधन दिले जाणार
पूर्वी मानधनासाठी निवडलेल्या कलावंतांना श्रेणीनुसार मानधन दिले जात होते. ‘अ’ श्रेणीतील कलावंतांना 3150 रुपयांचे, ‘ब’ श्रेणीतील कलावंतांना 2700 रुपयांचे आणि ‘क’ श्रेणीतील कलावंतांना 2250 रुपयांचे मानधन दर महिना दिले जात होते. पण, आता ज्येष्ठ कलावंतांना श्रेणीनुसार मानधन दिले जाणार नसून प्रत्येक ज्येष्ठ कलावंताला दर महिन्याला 5 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनासाठीच्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात ज्येष्ठ कलावंतांची संख्या मोठी आहे. अधिकाधिक कलावंतांना मानधन मिळावे, यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मानधनासाठी कलावंतांची संख्या शंभरवरून दोनशे करावी, अशी मागणी करणार आहोत.
- सुरेश धोत्रे, अध्यक्ष, जिल्हास्तरीय ज्येष्ठ कलावंत मानधन समिती
ज्या जुन्या कलावंतांना मानधन येणे बंद झाले आहे, त्या कलावंतांनी ग्रामपंचायत, ग्रामसेवक किंवा जिल्हा परिषदेत येऊन आधार कार्ड सबमिट करावे, जर थकीत मानधन मिळालेले नसेल, तर त्यासाठी अर्ज करावा.
- कौस्तुभ कुलकर्णी, सदस्य, जिल्हास्तरीय ज्येष्ठ कलावंत मानधन समिती