सासवड: पुरंदर तालुक्यात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील तीन गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यातील तीन गावांना व या गावातील वाड्यावस्त्यांना दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा उपअभियंता पुरंदर सचिन घुबे यांनी दिली
घोरवडी धरणातून दिवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू आहे. परंतु, पाइप फुटीने ही योजना बंद आहे. त्यामुळे या योजनेवर असलेल्या दिवे व वाड्यावस्त्या तसेच सोनोरी, वनपुरी, उदाचीवाडी या गावांना सध्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सोनोरी, झेंडेवाडी, राजुरी, वाल्हे, सिंगापूर, पोंढे, साकुर्डे, वागदरवाडी आदी गावांना टँकर मंजूर झाले आहेत.
त्याचप्रमाणे एखतपूर, रिसे, खानवडी, वाळुंज या गावांचे टँकरने मागणी प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले असून त्यांनाही लवकरच मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. पिसे, नायगाव, पूरपोखर या गावांना 2 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्याचे पाणीपुरवठा उपअभियंता सचिन घुबे यांनी सांगितले.
सध्या गावातील पाणीपुरवठा करणार्या विहिरीने तळ गाठलेला आहे. घोरवडी धरणावरील दिवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तीन वर्षे बंद आहे. टँकरसाठी प्रस्ताव देऊन 15 दिवस झाले तरीही प्रशासनाकडून टँकर पुरवण्याच्या कामात दिरंगाई होत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तसेच जलजीवन योजनेचे काम अपूर्ण आहे.
संतोष काळे, सरपंच, सोनोरी.