

पुणे: मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यामुळे सोन्याला मागणी वाढल्याने 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 91 हजारांपार गेला आहे. तर, एक किलो चांदीचा भाव 1 लाख 4 हजार रुपये आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदी करण्याची परंपरा पाळली जाते. लग्नसमारंभासाठीचे दागिने देखील शुभमुहूर्तावर खरेदी केले जातात. तर, गुंतवणूक म्हणून सोन्याचे नाणे अथवा वेढणी खरेदी मुहूर्तावर केली जाते.
गेल्या दोन दिवसांत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 हजार 360 रुपयांनी वाढून 91 हजार 200 रुपयांवर गेला आहे. तर, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव दोनशे रुपयांनी वाढून 83,600 रुपयांवर गेला आहे. वस्तू आणि सेवाकराची तीन टक्के रक्कम गृहित धरल्यास 22 आणि 24 कॅरेट सोन्यासाठी अडीच हजार ते सत्तावीसशे रुपयांहून अधिक रक्कम अतिरिक्त मोजावी लागते. सोन्याचे दागिने 22 कॅरेटमध्ये होत असल्याने ग्राहकांना प्रतितोळा दागिन्यासाठी 86 ते 87 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
यात प्रत्येक ब्रँडनुसार घडणावळीची रक्कम वेगळी असते. त्यानुसारही सोन्याच्या दागिन्यांचे दर बदलतात. चांदीच्या दैवतांच्या मूर्ती, लक्ष्मीची प्रतिमा अशा चांदीच्या वस्तूंचीही खरेदी केली जाते. चांदीचा प्रतिकिलो भाव 1 लाख 4 हजार रुपयांवर गेला आहे. जीएसटीसह चांदीचा भाव तीन हजारांनी आणखी वाढतो.