­Maharashtra Assembly Polls : रणसंग्राम सुरू; लढतीचे चित्र अस्पष्टच

जागावाटप निश्चित झाल्यानंतरच उमेदवारांची नावे जाहीर होणार
­Maharashtra Assembly Polls
विधानसभा निवडणूक pudhari
Published on
Updated on

विधानसभा निवडाणुकीचा रणसंग्राम जाहीर झाला असला, तरी पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतील लढतीचे चित्र अद्यापही अस्पष्टच आहे. महायुतीसह महाविकास आघाडीतही काही जागांसाठी रस्सीखेच सुरू असून, जागावाटप निश्चित झाल्यानंतरच उमेदवारांची नावे जाहीर होणार आहेत. त्यानंतरच कोणता पक्ष आणि कोण उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी जाहीर झाली. त्यामुळे आता कोणत्या मतदारसंघात, कोण कोणासमोर उभे ठाकणार, याची उत्सुकता वाढली आहे. पुणे शहरात विधानसभेचे एकूण आठ मतदारसंघ आहेत. त्यामधील सर्व जागांचे लढतीचे चित्र अस्पष्ट आहे. महाविकास आघाडीत हडपसर आणि पर्वती या दोन जागांवर अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे. हडपसरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडे आहे. मात्र, या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

त्यामुळे हडपसरच्या जागावाटपासह महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, हे स्पष्ट होण्यासाठी अवधी लागणार आहे. महायुतीतही शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे. हीच अवस्था पर्वती विधानसभा मतदारसंघाची आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी आग्रही मागणी आहे. अद्याप त्याबाबतही निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनाच पुन्हा संधी देणार की उमेदवार बदलणार, याबाबतही चित्र स्पष्ट नाही. महायुतीतही वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरूच आहे. येथील विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने ही जागा राष्ट्रवादीकडे राहील अशी शक्यता आहे. मात्र, माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही निवडणुकीची तयारी दर्शविल्याने या जागेबाबत संभ—म कायम आहे. महाविकास आघाडीकडून पठारे कुटुंबातील उमेदवार कोण असणार, याबाबतही गोंधळाचे वातावरण आहे.

उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत संभ्रम

एकीकडे आघाडी आणि युतीत जागावाटपाचा तिढा असतानाच उर्वरित मतदारसंघांतही एकापेक्षा अनेक इच्छुक उमेदवार असल्याने उमेदवारीची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार, हे अजूनही स्पष्ट नाही. काही मतदारसंघांत थेट विद्यमान आमदारांविरोधात पक्षातील इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता उमेदवार निवडताना नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. मात्र, येत्या आठवडाभरात जागावाटप आणि उमेदवार निश्चित होऊन पुण्यातील आठ जगांवरील रणसंग्रामात नक्की कोण कोणाशी भिडणार, याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news