

Pune Municipal Corporation Election
पुणे: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आता नगरसेवकांची संख्या 166 इतकी होणार आहे. महापालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश होऊनही नगरसेवकांची संख्या अवघी दोन इतकीच वाढणार आहे. जनगणना न झाल्याने 2011 च्या लोकसंख्येनुसारच नगरसेवकांची संख्या निश्चित होणार असल्याने त्याचा मोठा फटका इच्छुकांना बसला आहे.
पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या 162 इतकी होती. त्यानंतर ऑक्टोबर 2017 मध्ये हद्दीलगतच्या 11 गावांचा समावेश महापालिकेत झाला. त्यामुळे 11 गावांसाठी 2011 ज्या लोकसंख्येनुसार दोन सदस्यांचा प्रभाग करून पोटनिवडणूक घेण्यात आली, त्यामुळे नगरसेवकांची संख्या 164 इतकी झाली होती. (Latest Pune News)
त्यानंतर जुलै 2021 मध्ये महापालिकेत आणखी 23 गावांचा समावेश झाला. त्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढणार असली तरी केवळ दोन इतकीच वाढणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांमधून आता नगरसेवकपदाचे स्वप्न पाहणार्या इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी पडणार आहे.
तर नगरसेवकांची संख्या 1 ने घटणार
महापालिकेत समाविष्ट झालेले उरुळी देवाची व फुरसुंगी ही दोन गावे राज्य शासनाने वगळली आहेत. या दोन गावांची लोकसंख्या 75 हजार 465 इतकी आहे. ही गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने त्यामुळे महापालिकेची लोकसंख्या 34 लाख 75 हजार इतकी झाली आहे. त्यामुळे नगरसेवकाची संख्या एकने कमी होण्याची भीती असून ती 166 ऐवजी 165 इतकी होऊ शकते.
अशी होते नगरसेवकांची संख्या निश्चित
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या 2016 कायद्यातील सुधारीत तरतुदीनुसार 30 लाख लोकसंख्येला 161 नगरसेवक तर त्यापुढील प्रत्येक 1 लाख लोकसंख्येला 1 नगरसेवक याप्रमाणे नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
त्यानुसार 2011 ची महापालिकेची लोकसंख्या 31 लाख 24 हजार इतकी आहे. त्यानुसार 2017 च्या महापालिका निवडणुकीत 30 लाख लोकसंख्येला 161 आणि त्यावरील 1 लाख लोकसंख्येमागे 1 याप्रमाणे नगरसेवकांची संख्या 162 इतकी होती.
त्यानंतर ऑक्टोबर 2017 ला महापालिकेत 11 गावे समाविष्ट झाली. या गावांची लोकसंख्या दीड लाख इतकी होती. त्यामुळे केवळ दोन नगरसेवकांची संख्या वाढून ही संख्या 164 इतकी झाली. आता 23 गावांची लोकसंख्या 2 लाख 22 हजार इतकी आहे.
त्यामुळे महापालिकेची एकूण लोकसंख्या आता 35 लाख इतकी होत आहे. त्यानुसार आता 30 लाख लोकसंख्येमागे 161 नगरसेवक तर त्यापुढील प्रत्येक 1 लाख लोकसंख्येमागे 1 याप्रमाणे 5 लाख लोकसंख्येमागे 5 नगरसेवक याप्रमाणे नगरसेवकांची संख्या 166 इतकीच होईल.