महावितरणच्या सूचनेला पालिकेची केराची टोपली; काय आहे सूचना?

महावितरणच्या सूचनेला पालिकेची केराची टोपली; काय आहे सूचना?

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : घोरपडी येथील नवीन रेल्वेउड्डानपुलाच्या पिलरच्या शेजारी महावितरण कंपनीची उच्चदाब विद्युत वाहिनी आहे. या वाहिनीच्या वरून पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम महापालिकेकडून सुरू होते. विद्युत वाहिनीवरून चुकीच्या पध्दतीने पावसाळी वाहिनी टाकू नका, अशी सूचना महावितरणने करून देखील महापालिकेने मनमानी पध्दतीने पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू ठेवले आहे.

या ठिकाणी पावसाळी वाहिनी टाकल्याने येथील विद्युत वाहिनीला धोका होऊ शकतो हे लक्षात आल्यावर येथील काही नागरिकांनी मागील पंधरा दिवसांपूर्वी याविषयी महावितरणला कळविले होते. महावितरणच्या अधिकार्‍यांनी हे काम तातडीने थांबविले होते. हे काम चुकीच्या पध्दतीने करू नका, असे पत्रही महावितरणने महापालिकेला दिले होते. मात्र, महावितरणच्या या पत्राला केराची टोपली दाखवून महापालिका प्रशासनाने हे काम करित असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

उड्डाणपुलाच्या खाली महापालिका चुकीच्या पध्दतीने पावसाळी वाहिनी टाकत आहे. त्यामुळे येथील विद्युत वाहिनीला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने विद्युत वाहिनीपासून आवश्यक ते अंतर ठेऊन पावसाळी वाहिनी टाकावी; अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) नितीन निगडे, सत्यजित कवडे, रमेश क्षिरसागर, दिपक फडतरे व आशिष कवडे यांनी सांगितले.

विद्युत वाहिनीवरून पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. मागील पंधरा दिवसांपूर्वी आम्ही हे काम थांबविले होते. चुकीच्या पध्दतीने येथे पावसाळी वाहिनी टाकू नका, असे पत्रही महापालिकेला दिले होते. मात्र, त्यांनी हे काम पुन्हा सुरू केल्याने आम्ही पुढील कार्यवाही करणार आहोत.

-जितेंद्र भिरूड, कार्यकारी अभियंता, महावितरण

घोरपडी येथील उड्डाणपुलाखाली विद्युतवाहिनी आहे. या वाहिनीपासून पुरेस अंतर ठेवून पावसाळीवाहिनी टाकली आहे.

– अभिजीत आंबेकर, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news