

कोथिंबीर, मेथी वगळता अन्य पालेभाज्यांची आवक घटली
पालक, करडई, चवळई, मुळ्याची आवक 5 हजार गड्ड्यांच्या आत
नाशिक, लातूर परिसरातून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर बाजारात दाखल
पुणे : राज्यात वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनच्या तडाख्याने पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारात कोथिंबीर, मेथी व कांदापात वगळता अन्य पालेभाज्यांची आवक अवघी पाच टक्क्यांवर आली आहे. त्यामध्ये पावसाने मार खाललेल्या दर्जाहीन पालेभाज्या जास्त असल्याने किरकोळ बाजारात दर्जेदार पालेभाज्यांचे दर 40 ते 50 रुपये जुडींवर पोहचले आहेत. तर, पावसाचा तडाखा बसलेल्या भाज्यांनाही अन्य दिवसांच्या तुलनेत चांगले दर मिळत आहेत. त्यांपैकी काही भाज्या फेकण्यात जात असल्याने शेतकर्यांना खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.
पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील सासवड परिसर, हडपसर, उरळी कांचन, लोणी काळभोर, यवत परिसरात पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तेथून शहरात पालेभाज्या विक्रीसाठी पाठविल्या जातात. याखेरीज, लातूर तसेच नाशिक परिसरातून कोथिंबीर मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत असते. यंदा मॉन्सून पंधरा दिवस आधीच राज्यात दाखल झाला आहे. त्यात पुणे जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे, या भागातील उत्पादनाला सर्वाधिक फटका बसला आहे.
तरकारी विभागात कोथिंबीर मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यापाठोपाठ मेथी आणि कांदापातीची आवक होत आहे. बाजारात नाशिक व मराठवाडा भागातून येणार्या कोथिंबीरीला कमी प्रमाणात पावसाचा तडाखा बसल्याने ती चांगल्या स्वरुपात बाजारात येत आहे. त्यांना चांगले दर मिळत आहेत. तर, पुणे जिल्ह्यातून येणार्या पालेभाज्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. पावसाने भाज्या भिजल्याने त्यांचे दरही कोसळले आहेत. परिणामी, शेतकर्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. पातळ पाने व काड्या असलेल्या पालेभाज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये शेपू बाजारात उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
राजेंद्र सूर्यवंशी, पालेभाज्यांचे व्यापारी, मार्केट यार्ड
एरवी येथून मार्केट यार्डात दररोज प्रत्येकी पन्नास गड्ड्यांची होणारी आवक सद्य:स्थिती पाच हजार गड्डींच्या आत आली आहे. नाशिक तसेच लातूर परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने येथून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर बाजारात दाखल होत आहे. बाजारात मंगळवारी दीड लाख गड्डी कोथिंबीरीची आवक झाली. याखेरीज, मेथी व कांदापातची आवकही पंधरा हजार गड्ड्यांपर्यंत होत आहे. मात्र, त्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतमाल हा कचराकुंडीत फेकण्यात जात असल्याने आवक जास्त असूनही या पालेभाज्यांचे भावही तेजीत आहेत.