साडेतीन मूहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीसाठी गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात फुलांच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दसर्याच्या दिवशी पूजेसह हार, तोरणासाठी लागणार्या झेंडूला शहर व जिल्ह्यासह परराज्यांतील विक्रेत्यांकडून फुलांना मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर फुलबाजारात गुरुवारपासून झेंडूची आवकही वाढली. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने घाऊक बाजारात झेंडूच्या फुलांना 50 ते 100 रुपये; तर किरकोळ बाजारात 100 ते 130 रुपये किलो दर मिळाल्याने यंदा झेंडूची फुले भाव खाऊ लागल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.
दसर्याच्या सणासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याचे सांगून फुलांचे व्यापारी सागर भोसले म्हणाले, नवरात्रींपासून फुलांच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. बाजारात जिल्ह्यासह सोलापूर, सातारा मराठवाड्यातील बीड, लातूर येथून झेंडू मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहेत. यामध्ये नारंगी, पिवळा, कलकत्ता, तुळजापुरी, कापरी आदी झेंडूच्या फुलांचा समावेश आहे. घाऊक बाजारात त्याच्या प्रतिकिलोस 50 ते 100 रुपये भाव मिळत आहे. झेंडूच्या फुलांसह अन्य सर्वच फुलांना मागणी असल्याने फुले तेजीत आहेत. दसर्याच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गुरुवारपासून जिल्ह्यासह परराज्यातील खरेदीदारांनी मोठी गर्दी केली होती.
सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उत्पादनात वाढ झाली होती. मात्र, श्रावण महिना, गणेशोत्सव व त्यानंतर पितृपक्षकाळात झेंडूच्या फुलांना विशेष मागणी नव्हती. त्यामध्ये झालेल्या पावसाने फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही शेतकर्यांनी बाजारातील पिके काढून टाकल्याने त्या तुलनेत यंदा आवक कमी आहे. दसर्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बाजारात झेंडूच्या फुलांची समाधानकारक आवक होत आहे. आवक-जावक कायम असल्याने शेतकर्यांना अपेक्षित भाव मिळत आहे. यंदा समाधानकारक भाव असल्याने ग्राहक तसेच शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.