पुणे: देशाची राजधानी दिल्लीत यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून सारस्वत व मराठीप्रेमी रसिक या संमेलनासाठी खास विशेष रेल्वेने दिल्लीकडे कूच करणार आहेत. बुधवारी (दि. 19) दुपारी पुण्यातून निघणार्या रेल्वेत यंदा प्रथमच मराठी साहित्ययात्री संमेलन रंगणार आहे. ही विशेष रेल्वे गुरुवारी (दि. 20) रात्री दिल्ली येथे पोहचणार आहे.
साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणार्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, रेल्वेतील प्रत्येक बोगीला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. मराठी भाषामंत्री उदय सामंत हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष, लेखक शरद तांदळे हे संमेलनाध्यक्ष, तर वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत.
मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच संमेलन असणार आहे. प्रवासी साहित्य संमेलन भरवावे, या संकल्पनेतून हे संमेलन आयोजिले आहे. या संमेलनानिमित्त उदय सामंत हेही रेल्वेतून प्रवास करत साहित्यिक, साहित्यप्रेमींशी संवाद साधणार आहेत. ज्येष्ठ लेखिका डॉ. संगीता बर्वे याही रेल्वेतील या संमेलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी शनिवारी (दि. 15) पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, वैभव वाघ, डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार आदी उपस्थित होते. या संमेलनात महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसेच शाहिरी आणि भजन मंडळांचा सहभाग असणार आहे. युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मराठी साहित्ययात्री संमेलन भरविण्यात येत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
पुस्तक दिंडीही काढणार
बुधवारी (दि.19) छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी, पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वेप्रवासात 1200 पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून, जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक स्वागत करणार आहेत.
परतीच्या प्रवासातही संमेलन
रेल्वे गुरुवारी (दि. 20) दिल्लीत पोहचणार असून, दिल्ली स्थानकावर पोहचल्यानंतर पसायदानाच्या गायनाने मराठी साहित्ययात्री संमेलनाची व पहिल्या टप्प्यातील प्रवासाची सांगता होणार आहे. परतीच्या प्रवासात देखील हे संमेलन रंगणार असून, 25 फेब—ुवारी रोजी पुणे रेल्वेस्थानकावर या अनोख्या संमेलनाची सांगता होईल.