सिंहगड रस्त्यावरील फेरीवाल्यांना प्रशासनाचेच अभय

सिंहगड रस्त्यावरील फेरीवाल्यांना प्रशासनाचेच अभय

पुणे : पुढारी प्रतिनिधी : सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटली जात असताना महापालिका प्रशासनाकडून मात्र सोईस्करपणे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या अतिक्रमणांना अधिकार्‍यांची हप्तेखोरी कारणीभूत असल्याचे काही अधिकृत व्यावसायिकांनी सांगितले.

शहरातील फेरीवाल्यांना आणि पथारी व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वार्षिक शुल्क घेऊन फेरीवाला प्रमाणपत्र दिले जाते. ज्याच्या नावावर प्रमाणपत्र आहे, त्या व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने व्यवसाय करणे बंधनकारक आहे. पोटभाडेकरू ठेवल्याचे आढळल्यास अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. फेरीवाला प्रमाणपत्रातील अटी-शर्तींचा भंग केल्यास प्रथम वेळेस एक हजार रुपये दंड, तर दुसर्‍या वेळेस 5 हजार रुपये दंड आणि त्यानंतर फेरीवाला प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई केली जाते.

मात्र, शहरातील लहान-मोठ्या रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिकांची अतिक्रमणे थाटली जातात. ही अतिक्रमणे प्रशासनातील अधिकार्‍यांना आणि त्या-त्या परिसरातील नेत्यांना हप्ते देऊन थाटली जातात. असेच चित्र सिंहगड रस्त्यावरही पाहायला मिळते. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आल्याने वाहतुकीसाठी अरुंद रस्ता उपलब्ध आहे. त्यातच पदपथ सोडून मुख्य रस्त्याच्या कडेला फळे व भाजीविक्रेते आपला व्यवसाय थाटत असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडीत भर पडत आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावर विक्रेते व टेम्पोतून व्यवसाय करणार्‍यांचे अतिक्रमण वाढत असताना महापालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. दरम्यान, रस्त्यावरील व्यावसायिकांकडून अतिक्रमण अधिकार्‍यांना हप्ते मिळतात, त्यामुळे अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते, असा आरोप काही अधिकृत व्यावसायिकांनी
केला आहे.

पुढार्‍यांच्या आशीर्वादाने अंडाभुर्जी जोमात

उड्डाणपुलाच्या कामामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने राजाराम पूल चौक ते विठ्ठलवाडी चौक यादरम्यान पदपथावर व रस्त्यावर व्यवसाय करणार्‍यांना पायबंद घातला आहे. यामुळे रस्त्यावर उभे राहणारे व्यावसायिक टेम्पो बंद झाले आहेत. मात्र, या ठिकाणी अंडाभुर्जीच्या दोन गाड्या रात्रीच्या वेळी पदपथावर व्यवसाय थाटतात. या ठिकाणी पदपथासह रस्त्यावरही बसण्याचे स्टूल ठेवलेले असतात. या ठिकाणी रात्रीच्या वेळी दुचाकींसह चारचाकीही थांबतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या दोन्ही हातगाड्या माजी नगरसेविकेच्या कार्यकर्त्यांच्या असल्याने प्रशासनाकडून यावर कारवाई केली जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रचंड वाहतूक असलेल्या रस्त्याच्या कडेलाच पार्किंग

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने पदपथ लहान करून रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली आहे. आनंदनगर ते विठ्ठलवाडी यादरम्यान कामासाठी रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होत असताना याच रस्त्यावर मॉलमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक व वेगवेगळे व्यावसायिक आपल्या चारचाकी गाड्या रस्त्याच्याच कडेला पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीसाठी केवळ एक किंवा दीड लेन उपलब्ध होते. या रस्त्यावर दुचाकी गाड्यांवर कारवाईसाठी फिरणारे वाहतूक पोलिस या चारचाकी गाड्यांकडे मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष करतात.

या ठिकाणी थाटण्यात आली आहेत अतिक्रमणे

  • पानमळा ते पु. ल. देशपांडे उद्यान येथील पदपथ व उद्यान प्रवेशद्वार या परिसरात.
  • राजाराम मळा ते विठ्ठलवाडी यादरम्यान अंडाभुर्जीच्या गाड्या राजरोजपणे लागतात.
  • वडगाव येथे कालव्याच्या पुलावरच भाजी विक्रीचे टेम्पो उभे केले जात आहेत.
  • अभिरुची ते त्रिमूर्ती हॉस्पिटल यादरम्यान पदपथ सोडून रस्त्यावर व्यवसाय थाटले जातात.
  • लायगुडे हॉस्पिटलकडे जाणार्‍या रस्त्याच्या चौकापासून नांदेड फाटा यादरम्यान रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक टेम्पो थांबलेले असतात.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news