Pune Encroachment: अतिक्रमणांमुळे कोंडला पदपथांचा श्वास; महापालिकेकडून कारवाईचा फार्स

पथक जाताच परिस्थिती ’जैसे थे’, बहुतांश प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे
Pune Encroachment
अतिक्रमणांमुळे कोंडला पदपथांचा श्वास; महापालिकेकडून कारवाईचा फार्सPudhari
Published on
Updated on

निनाद देशमुख

पुणे: पादचार्‍यांच्या सुरक्षेसाठी पुण्यात ‘पादचारी दिवस’ साजरा केला जातो. ज्या पदपथांवरून पादचारी चालतात, त्या पदपथांचा श्वास पथारीवाले, छोटे दुकानदार तसेच काही बड्या हॉटेल तसेच व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे कोंडला आहे. परिणामी, नागरिकांना चालण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

शहरातील बहुतांश पदपथ अनधिकृत विक्रेत्यांनी अक्षरशः ताबा मिळवला आहे. तरीही पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमणविरोधी कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आम्ही चालायचे कोठून? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (Latest Pune News)

Pune Encroachment
बीएसएनएल सेवेला घरघर; संपर्क साधायचा कसा दूरवर?

पुण्यातील बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. पदपथ व फ्रंट तसेच साइड मार्जिनमध्ये ही अतिक्रमणे करण्यात आली आहेत.

फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता, लक्ष्मी रस्ता आदी प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. हे पदपथ जणू पथारीवाल्यांच्याच मालकीचे झाले आहेत, असेच चित्र आहे.

लग्नसोहळा, सण, उत्सव, समारंभांमुळे पुणे जिल्ह्यासह शहराच्या कानाकोपर्‍यातील नागरिक खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. परिणामी तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, शनिपार चौक, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

Pune Encroachment
Pune Municipal Corporation News : ‘ड्रेनेजची घाण उघड्यावर टाकणाऱ्या ठेकेदारांची बिले काढू नका’

अशावेळी त्यांना चालण्यासाठी पदपथ मोकळे नसल्याने रस्त्यावरून चालावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, स्वारगेट, महात्मा गांधी रस्ता यांसारख्या सर्व मुख्य रस्त्यांवरील पदपथ अतिक्रमणांनी वेढले आहेत.

बाजीराव रस्त्यावर शनिपार चौकापासून ते शनिवारवाड्यापर्यंत रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या पदपथांवर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. तुळशीबागेतील महाराष्ट्र बँकेसमोरील पदपथांवर अक्षरशः पदपथ विकत घेतल्यासारखा अनधिकृत विक्रेत्यांचा वावर असतो.

हुजुरपागा व नूमवि शाळेसमोरील रस्ता, अप्पा बळवंत चौक ते शनिवारवाड्यापर्यंत दोन्ही बाजूंना काही महिन्यांपासून अचानक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हातगाड्या लावल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरापासून ते मंडईतील गोटीराम भैया चौकापर्यंत अतिक्रमण वाढले आहे. लक्ष्मी रस्त्यावर देखील हीच परिस्थिती आहे.

पालिकेच्या नोटीसीकडे दुर्लक्ष

अतिक्रमण काढण्यापूर्वी पालिकेमार्फत संबंधितांना नोटीस दिली जाते. मात्र, या नोटीसकडे बिनदिक्कतपणे दुर्लक्ष केले जात आहे. जेव्हा कारवाई करण्यास पथक येते तेव्हा अतिक्रमणे काढून घेतली जातात. मात्र, पथक गेल्यावर पुन्हा रस्त्यावर व पदपथावर दुकाने थाटली जातात.

कारवाईनंतरही फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणे ‘जैसे थे’

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने फर्ग्युसन रस्त्यावर असणार्‍या अतिक्रमणांवर दोन दिवसांपूर्वी कारवाई केली होती. मात्र,हे पथक गेल्यावर पुन्हा विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे ही कारवाई निव्वळफार्स ठरली आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

शहरात छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह मोठ्या व्यावसायिकांनी देखील पदपथांवर अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांचा सर्व्हे करून ते काढण्यासाठी अतिक्रमण विभागाला माहिती देणे गरजेचे आहे. मात्र, अनेकदा आर्थिक व्यवहारातून या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ही कारवाई योग्यरीत्या केली जात नाही.

पुणे शहरात आम्ही अतिक्रमण करणार्‍यांंवर कारवाई सुरू केली आहे. तब्बल 15 ते 16 प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत फर्ग्युसन रस्ता व गंगाधाम चौकात कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यासाठी नागरिकांच्या रोज दोन ते तीन तक्रारी येत असून, आम्ही त्यांची दखल घेत आहोत.

- संदीप खलाटे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news