

पुणे: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने राज्यातील पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा व पॅट परीक्षा 8 ते 25 एप्रिल या कालावधीत घ्याव्यात, असे स्पष्ट केले आहे.
तर, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने दोन्ही परीक्षा 3 ते 23 एप्रिलदरम्यान घेण्यासंदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे नेमक्या कोणाच्या वेळापत्रकानुसार परीक्षा होणार, यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला असून, विद्या प्राधिकरणाने यासंदर्भात खुलासा करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.
विद्या प्राधिकरणाच्या वतीने राज्यातील पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा व पॅट परीक्षा केव्हा घेतल्या जाव्यात, याबाबत स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार राज्यातील शाळांनी 8 ते 25 एप्रिलदरम्यान परीक्षा घेणे अपेक्षित आहे. परंतु, मुख्याध्यापक संघाने या कालावधीत परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे अडचणीचे ठरत असल्याने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली.
परंतु, त्यास राज्याच्या शिक्षण विभागाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर मुख्याध्यापक संघाने स्वत:चे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. या वेळापत्रकानुसार पॅट परीक्षा या शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. वार्षिक परीक्षा मात्र शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार न घेता मुख्याध्यापक संघाने प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार घेतल्या जातील, असे मुख्याध्यापक संघटनेतील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षा कोणत्या कालावधीत घ्याव्यात, यासंदर्भात विद्या प्राधिकरण आणि मुख्याध्यापक संघ यांच्यात वाद सुरू आहे. परंतु, शासनाने प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या नाहीत, तर संबंधितांवर कारवाई होणार आहे.
त्यानुसार मुख्याध्यापक संघाच्या काही पदाधिकार्यांना शिक्षण विभाग नोटीस बाजाविण्याच्या तयारीत आहे. परंतु, मुख्याध्यापक संघ आणि विद्या प्राधिकरण यांच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्या प्राधिकरण तसेच मुख्याध्यापक संघ यांनी तातडीने बैठक घेऊन परीक्षांसंदर्भात सामोपचाराने तोडगा काढावा आणि त्याची माहिती विद्यार्थी-पालकांना द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
मुख्याध्यापक संघाच्या वेळापत्रकानुसार अवघ्या दोन दिवसांमध्ये परीक्षा सुरू होणार आहे, तर विद्या प्राधिकरणाच्या वेळापत्रकानुसार येत्या मंगळवारी परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे परीक्षा नेमक्या कोणाच्या वेळापत्रकानुसार सुरू होणार, यासंदर्भात अंतिम चित्र नेमके कधी स्पष्ट होणार? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
परीक्षा घेण्याचा अधिकार नेमका कुणाला?
शाळांमध्ये परीक्षा घेण्याचा अधिकार विद्या प्राधिकरणाला आहे की मुख्याध्यापक संघाला? याविषयी शिक्षण विभागातील एका अधिकार्याला माहिती विचारली असता त्यांनी हा अधिकार शाळांनाच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्या प्राधिकरणाचे अधिकारी केवळ अहंकारातून त्यांच्याच भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु, विद्यार्थिहितासाठी विद्या प्राधिकरण तसेच मुख्याध्यापक संघ यांनी तातडीने तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.