मंत्रालयातील फाईल होणार ट्रॅक: उदय सामंत

येत्या दोन महिन्यांत उद्योजकांसाठी आणणार डॅशबोर्ड
Udya Samant News
मंत्रालयातील फाईल होणार ट्रॅक: उदय सामंतPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यात नवीन उद्योग यायचे असतील आणि असलेल्या उद्योगांचा विस्तार करायचा असेल, तर त्यांना सोयीसुविधा द्याव्या लागतील. सरकारशी संबंधित विविध परवानगी अथवा पूरक कामांची फाइल मंत्र्यांकडे, सचिवांकडे की कक्ष अधिकार्‍यांकडे, याची माहिती उद्योजकांना दिसेल. त्यासाठी येत्या दोन महिन्यांत डॅशबोर्ड आणणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये आयोजित जागतिक उद्योजक परिषदेत सामंत बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, लेखक संदीप वासलेकर, ’गर्जे मराठी’चे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे (एमईडीसी) अध्यक्ष अतुल शिरोडकर, पिंपरी-चिंचवड ट्रस्टच्या उपाध्यक्षा पद्मजा भोसले, गिरीश देसाई, कार्यक्रमाचे संयोजक सचिन इटकर या वेळी उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी दृकश्राव्य माध्यमाद्वारे परिषदेत सहभागी झाले होते.

सामंत म्हणाले, उद्योजकांना आपली फाईल नेमकी कुठे अडली हे समजावे, यासाठी डॅशबोर्ड तयार केला जाईल. त्या माध्यमातून उद्योगासाठीची जागा, राज्य सरकारकडून दिल्या जाणार्‍या सवलती, याची माहिती मिळणे सुलभ होईल. आम्ही दाओसमध्ये जाऊन विदेशी उद्योगांना पायघड्या घालतो. स्थानिक उद्योगांनाही विस्तारासाठी तशाच पायघड्या घातल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिक उद्योगांनी विस्तारासाठी 96 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून राज्यात 1.13 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकावर आहे. नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या गडचिरोलीतही गुंतवणूक करण्यासाठी उद्योग पुढे येत आहेत. येत्या काळात नक्षलवादाचा शिक्का पुसून गडचिरोली उद्योगनगरीही होईल. उद्योजकांना पोषक वातावारण दिल्यास ते राज्यात नक्कीच येतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात जंगल, पाणी आणि निसर्गसंपदा असल्याने पर्यटन उद्योगाला फार मोठी संधी आहे. त्यामुळे येथील सर्व स्तरातील लोकांना याचा फायदा होईल. नागपुरातील गोसे खुर्द येथे त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

विदेशातील मराठी उद्योजकांना पायघड्या

विदेशातही अनेक मराठी उद्योजक चांगला व्यवसाय करत आहेत. तेथील मराठी उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केल्यास त्यांनाही सवलती दिल्या जातील. जमीन, पाणी आणि उद्योगस्नेही वातावरण आम्ही त्यांना देऊ. विदेशातील मराठी माणसाला उद्योग व्यवसायामध्ये महत्त्वाची मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच परदेशी उद्योजकांसाठी मंत्रालयात एक स्वतंत्र विभाग निर्माण करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news