पुणे: सातार्यातील कुसेवाडी हे माझे गाव. गेली 40 वर्षे अविरत वारी करतोय. वयाच्या 66 व्या वर्षीही विठुनामाच्या गजरात तल्लीन होऊन पंढरीची वारी करतोय, याचे खूप समाधान वाटते. वारी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य विठुरायाच्या सेवेला समर्पित केले आहे. त्यामुळे वारीत जाणे ही माझ्यासाठी खूप सुखाची भावना आहे, असे वारीत सहभागी झालेले विणेकरी सुरेश फाळके वारीबाबत सांगत होते.
दोन मुलगे, मुली, पत्नी असा परिवार असलेले फाळके आपली शेती करता करताच विठ्ठलभक्तीत रममाण होतात. दरवर्षी न चुकता पंढरपूरची वारी करतात. (Latest Pune News)
वारीविषयी ते म्हणतात, ‘वारी हा केवळ आळंदी ते पंढरपूर हा प्रवास नाही, तर विठ्ठल दर्शनासाठी आसुसलेल्या प्रत्येक वारकर्यांच्या विठुभक्तीचा प्रवास आहे. त्यामुळेच ही वारी शतकानुशतके सुरू आहे. मी एका मानाच्या दिंडीत विणेकरी आहे.
माझ्यासह लाखो वैष्णव विठुदर्शनासाठी गेल्या 40 वर्षांपासून अविरत 250 किलोमीटर पायी चालत पंढरपूरची वारी करतात. वारीमुळे अनेक अडचणीतून सुटका झाली आणि संतांच्या संगतीत मला खरे समाधान मिळाले आहे. वारीने मला केवळ आध्यात्मिक समाधान मिळाले नाही, तर जीवनातील अनेक संघर्षांवर मात करण्याची शक्तीही दिली, संपूर्ण आयुष्य विठुनामात जगलो, आता पांडुरंग दर्शनाची आस लागली आहे,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.