भय इथले संपत नाही; तोडफोडीची शस्त्रधारी टोळधाड रोखणार कशी?

file photo
file photo

पुणे : शहरातील विविध भागांत वाहनांची तोडफोड आणि जाळपोळीच्या बारा घटना गेल्या दोन महिन्यांत घडल्या आहेत, तर गेल्या वर्षभरात तोडफोडीचे एकूण 42 गुन्हे पोलिसांकडे दाखल झाले. या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांतच अशा गुन्ह्यांची संख्या वाढल्याने पोलिस यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येते. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला असला, तरी तोडफोड करणार्‍या शस्त्रधारी टोळक्यांना अंकुश लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पुण्यात 'भय इथले संपत नाही' अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

किरकोळ कारणातून एकमेकांवर खुनी हल्ला केला जातोय, तर भाईला खुन्नस दिली म्हणून जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला जातोय. टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली जातेय, तर कोणी नशेत बेधुंद होऊन वाहने फोडतोय. त्यामुळे स्थानिक गुंडांवर पोलिसांचा वचक आहे की नाही? असा सवाल निर्माण झाला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाहने फोडणार्‍या टोळक्यावर पोलिसांनी यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे. तरी देखील या टोळक्यांचा उपद्रव थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.

यामध्ये मात्र सर्वसामान्य पुणेकर भरडला जातोय. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर पोलिस आयुक्तालयात गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके आणि त्यांच्या पंटर लोकांची शाळा घेतली. मात्र, असे असताना देखील एका महिन्यात वाहन तोडफोडीच्या सात घटना शहरात घडल्या आहेत. टोळक्यातील आरोपींना पकडल्यानंतर त्यांची खास गुन्हे शाखेकडून हजेरी घेतली जात आहे. परंतु, तरी देखील वाहन तोडफोडीच्या घटना थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.

पोलिसांची विशेष मोहीम

वाहन तोडफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस आता विशेष मोहीम हाती घेणार आहेत. अशा घटना घडणारे हॉटस्पॉट शोधणार. एक कृती कार्यक्रम हाती घेऊन काम सुरू करणार असल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

या घटना अधोरेखित करतात

  • खराडी परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. दरम्यान, त्याला विरोध करणार्‍या एका महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
  • येरवड्यातील पांडू लमाण वसाहतीत टोळक्याने धुडगूस घालत वाहने फोडली तसेच लोहगाव परिसरातील कलवडवस्तीत टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली होती. टोळक्याने दोन रिक्षांवर दगडफेक केली होती.
  • वारजे माळवाडीतील विठ्ठलनगरकडे जाणार्‍या सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली बारा वाहने फोडून स्थानिक नागरिकांच्या घरावर टोळक्याने दगडफेक केली. गांजाच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच एका व्यावसायिकाला कोयत्याच्या धाकाने मारहाण करीत लुटले होते.
  • पूर्ववैमनस्यातून हडपसरमधील गोसावीवस्ती भागात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुणासह त्याच्या वडिलांना लोखंडी हत्याराने मारहाण केली. त्यानंतर हत्याराच्या साहाय्याने येथील वीस ते बावीस गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली होती.
    टोळक्याने तळजाईकडे जाणार्‍या रस्त्यावर दोन दुचाकींसह 26 गाड्यांची तोडफोड केली होती. या परिसरात सलग दोन दिवस धुडगूस घालत टोळक्याने ही तोडफोड केली होती.
  • वडारवाडी भागातील पांडवनगर महापालिका वसाहतीत गुंडांच्या टोळीने दहशत माजवून वीस वाहनांची तोडफोड केली. एका सराईत गुन्हेगाराने साथीदारांना सोबत घेऊन ही तोडफोड केली होती.
  • मुंढव्यात बुधवारी 9 वाहने फोडल्याचा प्रकार घडला. नागरिकांचे आर्थिक नुकसान तर झालेच, घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभरात 7 वाहन तोडफोडीच्या घटना घडल्यामुळे पोलिसांचं नेमकं चाललंय काय? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होऊ लागला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news