‘यशवंत’च्या जमिनीवर ‘आका’चा डोळा; मंडळी लावली कामाला

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय ‘आका’चा डोळा आहे.
Pune News
‘यशवंत’च्या जमिनीवर ‘आका’चा डोळा; मंडळी लावली कामालाPudhari
Published on
Updated on

लोणी काळभोर: यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय ‘आका’चा डोळा आहे. यामुळेच खरेतर कारखाना गेल्या 14 वर्षांपासून बंद आहे, नाही तर ‘यशवंत’पेक्षा अतिशय वाईट आर्थिक स्थिती असलेले कारखानेही या ‘आका’ने त्यातून बाहेर काढून सुरू केले आहेत. परंतु, जमिनीवर डोळा ठेवून ‘यशवंत’ बंद ठेवण्यातच जादा रस दाखविला आहे. आता या ‘आका’ने जमीन विक्रीस मान्यता मिळविण्यासाठी आपली मंडळी कामाला लावली आहे.

या जमीन विक्रीस परवानगी मिळविण्यासाठीच संचालक मंडळ निवडणुकीचा घाट घातला गेला होता की काय? अशी शंका आता सभासद व्यक्त करू लागले आहेत. निवडून आलेल्या संचालक मंडळाकडून गेल्या वर्षभरात कारखाना चालू करण्यासाठी नेमके काय प्रयत्न झाले? हे गुलदस्तात आहे. याची माहिती देखील सर्वसामान्य सभासदांना कळलेली नाही. आता थेट कारखान्याच्या मालकीच्या जमीन विक्रीसंदर्भातच माहिती समोर आली, यावर अनेक शेतकरी सभासदांकडून कडाडून विरोध होत आहे.

संचालक मंडळास जर जमीन विक्री न करता कारखाना चालू करता येत नसेल, तर त्यांनी बाजूला व्हावे, आम्ही सभासद भांडवल उभे करून कारखाना चालू करू, अशी चर्चा समोर आल्याने येणार्‍या सर्वसाधारण सभेत नेमके काय घडणार? याची उत्सुकता लागली आहे.

पणन मंडळाने प्रस्ताव फेटाळला

संचालक मंडळाकडून जमीन विक्रीसंदर्भात एक प्रस्ताव पणन महामंडळास दिला होता, तो नामंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नव्याने कारखान्याच्या सभासदांची सर्वसाधारण सभा घेऊन नवीन ठराव मंजूर करून तो साखर आयुक्तांच्या मंजुरीनंतर पुन्हा सादर करण्यात यावा, असे सांगितल्यावर ही सर्वसाधारण सभा घेण्यात येत असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

सहकार नामशेष करण्यात कोणाचा हात?

हवेली तालुक्यातील सहकारी क्षेत्र नामशेष करण्यात कोणाचा हात आहे, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिष्याची गरज नाही. गेली पंचवीस वर्षे यशवंत सहकारी साखर कारखाना, हवेली बाजार समिती अडचणीत आणण्याचे राजकारण सुरू आहे. हवेलीतील मंडळी आपल्या आवाक्यात राहत नाहीत, हे ओळखून जिल्ह्यातील ’आका’ने पद्धतशीर योजना आखून हे घडवून आणल्याचे हवेलीतील जाणकार खुलेआम बोलत आहेत.

कारखाना चालू करण्याची कोणतीही मानसिकता जिल्ह्यातील ’आका’कडे नव्हती, त्याचा डोळा तर जमिनीवर होता. त्यामुळे फक्त अडचणी निर्माण करण्यात त्यांनी धन्यता मानली. कारखाना बंद पडला त्या वेळी आणि त्यानंतरही बरीच वर्षे तो पंधरा-वीस कोटींतसुद्धा चालू झाला असता. परंतु, ’आका’ने त्याकडे लक्ष दिले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news