

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे: गुलेन बॅरी सिंड्रोमच्या उपचारांमध्ये आयव्हीआयजी इंजेक्शनचा वापर केला जातो. एका इंजेक्शनची किंमत 8 ते 10 हजार रुपये असून, एका दिवसात पाच इंजेक्शन द्यावे लागतात. जीबीएसवरील उपचार किमान पाच दिवस द्यावे लागत असल्याने केवळ उपचारांचा खर्च अडीच-तीन लाख रुपयांपर्यंत जात आहे. त्यामुळे रुग्णांना आणि कुटुंबीयांना आर्थिक भार सोसावा लागत आहे.
सध्या शहरात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण अचानक वाढू लागले आहेत. बहुतांश रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागत आहेत, तर काही रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासत आहे.
सध्या जीबीएसच्या निदानासाठी लागणार्या तपासण्या आणि उपचार केवळ खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असली, तरी जीबीएसच्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. खर्चाचा बोजा सहन करावा लागत असल्याने ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शहरातील खासगी रुग्णालयात 17 वर्षांचा मुलगा जीबीएसचे निदान झाल्याने उपचार घेत आहे. कुटुंबाचा केवळ दोन लाख रुपयांचा आरोग्य विमा काढलेला आहे. मात्र, सध्याच्या उपचारांसाठी तेवढे पैसे पुरेसे नाहीत. त्यामुळे नातेवाइकांकडून उसने पैसे घेऊन, एखादा दागिना मोडून उपचारांचा खर्च भागवावा लागणार असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या प्रातिनिधिक उदाहरणावरून रुग्णांची आणि कुटुंबीयांची जीवघेणी ससेहोलपट होताना दिसून येत आहे.
शहरात अचानकपणे जीबीएसच्या उद्रेकाची परिस्थिती उद्भवली आहे. ही दुर्मीळ स्थिती असून, रुग्ण अचानक वाढले आहेत. उपचार महाग असल्याने रुग्ण आणि नातेवाइकांवर आर्थिक भार ओढवला आहे. शासनातर्फे दुर्मीळ आजारांसाठी महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. मात्र, जीबीएसवरील उपचारांसाठी ती पुरेशी नाही. रुग्णांना आयव्हीआयजी, प्लाझ्मा एक्सचेंज तसेच व्हेंटिलेटर सपोर्ट लागतो. अशा परिस्थितीत उपचारांसाठी रुग्णांना शासकीय अनुदान मिळावे, अशी मागणी शासनाकडे केली जाणार आहे. तसेच, रुग्णालयांनीही रास्त दरात उपचार द्यावेत, अशी विनंती करण्यात येणार आहे.
- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखा
जीबीएसच्या निदानासाठी नर्व्ह कंडक्शन स्टडी केली जाते. तपासणीचा खर्च 1500 ते 2000 रुपयांदरम्यान आहे. स्पायनल फ्लुइड टेस्टसाठी 1000 रुपये लागतात. इंट्राव्हिनस इम्यनोग्लोब्युलिन (आयव्हीआयजी) या उपचारासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. याशिवाय आयसीयूचे चार्ज, औषधांवरही वेगळा खर्च होतो. त्यामुळे महागड्या उपचारांचा भार येत आहे. शासनाने यामध्ये मदतीचा हात दिल्यास रुग्णांना दिलासा मिळू शकेल.
- डॉ. अमित द्रविड, साथरोगतज्ज्ञ