पाटस: पाटस (ता. दौंड) येथे जलसंपदा विभागाच्या कर्मचार्यांनी खडकवासला कालव्यातून विनापरवाना पाणी चोरी करताना टँकरसहित एकाला पकडले. मात्र, वरिष्ठांचा फोन झाल्याने पाणी चोरावर कोणतीही कारवाई न करताच त्याला सोडून देण्यात आले. यामुळे जलसंपदा विभागावर शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली.
पाटस येथील टोलनाका परिसरात गुरुवारी (दि. 6) दुपारी 1 वाजता खडकवासला कालव्यातून टँकर हा विनापरवाना पाण्याची चोरी करताना पाटसचे जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता उत्कर्ष पाटील व कर्मचार्यांनी पकडला.
चौकशीत ते खासगी कामासाठी पाणी नेत असल्याचे उघड झाले. या वेळी पाटील यांच्यासह मोजणीदार प्रथमेश मिसाळ, कर्मचारी जालिंदर साबळे, भानुदास चौधरी, ज्ञानेश्वर पासलकर आदी उपस्थित होते.
सोलापूर महामार्गावरील यवत ते इंदापूर येथील झाडांची देखभाल करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी टोल प्रशासनाकडून पाण्याचे बिल ठेकेदाराला देण्यात येते. मात्र, ठेकेदाराकडून कालव्यातून पाण्याची चोरी करून झाडांना पाणी दिले जात असल्याचे गुरुवारच्या घटनेनंतर उघड झाले.
कालव्यातून विनापरवाना दहा हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या साह्याने पाण्याची चोरी करून महामार्गावरील झाडांना पाणी दिले जात आहे. महामार्गावर पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण चार वाहने आहेत. त्यामुळे एका दिवसात लाखो लिटर पाण्याची चोरी कालव्यातून होत असल्याचा अंदाज शेतकर्यांनी व्यक्त केला.
गुरुवारी टँकर पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर टँकरमालक घटनास्थळी आला. त्याने अधिकार्यांना फोन लावला. त्यानंतर टँकर सोडून देण्यात आला. याबाबत शेतकरीवर्गाने नाराजी व्यक्त केली. कालव्यातून पिकांसाठी मोटार लावून पाणी घेतल्यास जलसंपदा विभागाकडून पाणी चोरीचा गुन्हा दाखल केला जातो.
मात्र, राजकीय पदाधिकार्यांचा दबाव आल्यानंतर टँकरने पाणी चोरणार्यास सोडून दिले जाते. जलसंपदा विभागाच्या या कामकाजावर शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली.
खडकवासला कालव्यातून पाणी चोरीबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शाखा अभियंता उत्कर्ष पाटील यांना दिले आहेत.
- सुहास साळुंखे, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग, पाटस.