पौड: मुळशी धरण भागात चाचीवली येथे धरणाच्या पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह सोमवारी (दि. 17) दुपारी पौड पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळून आले. पडवळनगर-थेरगाव पिंपरी (पुणे) येथील आठ मित्र रविवारी (दि. 16) मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. चाचीवली-ताम्हिणी गावच्या हद्दीवरील वाघुरणेच्या ओढ्याजवळ ते मुळशी धरणाच्या पाण्यात उतरले.
पाण्यात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील अनिश राऊत (वय 18, डॉ. पाटील कॉलेज, पिंपरी) आणि विशाल राठोड (वय 17, फत्तेचंद जैन विद्यामंदिर, चिंचवड) हे दोघे रविवारी दुपारी बुडाले होते.
रविवारी त्यांचा शोध घेतला आसता ते मिळून आले नव्हते. त्यामुळे रात्री 9 वाजता शोधकार्य थांबविण्यात आले होते. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केल्यानंतर साडेअकराच्या दरम्यान दोघांचेही मृतदेह मिळून आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह पौड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.
तरुण बुडालेल्या ठिकाणाची उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांनी पाहणी केली. पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव, पोलिस हवालदार महेश पवार, गणेश लोखंडे, रॉकी देवकाते, कृष्णा पोरे, विकास खोमणे, अमोल सूर्यवंशी, मुळशी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमोद बलकवडे, निखिल शिवतरे, पोपट शिवतरे, हनुमंत नवले, समीर सुतार, शेलारमामा, शार्दूल बलकवडे, महाराष्ट्र अंडर वॉटर सर्व्हिसेस ऋषिकेश शिवतरे, ज्ञानेश्वर ढोकळे यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
