कोड असलेल्या व्यक्तींची ‘शुभमंगल’मय वाटचाल!

कोड असलेल्या व्यक्तींची ‘शुभमंगल’मय वाटचाल!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'मला लहानपणापासूनच कोड म्हणजेच अंगावर पांढरे डाग होते. या आगळ्यावेगळ्या रंगरूपासोबतही मी छान आयुष्य जगू शकते, हा आत्मविश्वास डॉ. माया तुळपुळे यांच्यामुळे निर्माण झाला. श्वेता असोसिएशनच्या वधू-वर मेळाव्यात तीन महिन्यांत माझे लग्न झाले आणि आता सुखी संसार सुरू आहे', हा अनुभव आहे दीप्ती कुलकर्णी-वाळिंबे यांचा!

आपल्याकडे आजही बाह्य सौंदर्याला अवास्तव महत्त्व दिले जाते. लग्नाळू मुलगी सुस्वरूप, सुंदर असली पाहिजे, ही पहिली अपेक्षा असते. त्वचेवर पांढरे डाग किंवा कोड असेल तर मुलीला नकारच मिळतो. त्यामुळे लग्न होण्यात अनेक अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेऊन कोड असणार्‍या मुला-मुलींना एकमेकांना भेटता यावे आणि अनुरूप जोडीदार शोधता यावा, यासाठी डॉ. माया तुळपुळे यांच्या श्वेता असोसिएशनतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.

श्वेता असोसिएशनतर्फे पांढरे डाग असलेल्या व्यक्तींसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन 17 डिसेंबर, रोजी नीतू मांडके हाऊस, आय. एम. ए. सभागृहात सकाळी 9.30 ते 2 या वेळेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका आणि अनुवादक सोनाली नवांगुळ, अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे उपस्थित राहणार आहेत. श्वेता असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण, मान्यवरांचा सन्मान आणि वधू-वर मेळावा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

महाराष्ट्रभरात श्वेता असोसिएशनतर्फे आजवर घेतलेल्या वधू-वर मेळाव्यांत पांढरे डाग असलेल्या जवळपास 1400 मुला-मुलींची लग्ने ठरली आहेत. तसेच राज्यभर जवळपास 3500 जण श्वेता असोसिएशनसोबत जोडले गेले आहेत. 17 डिसेंबर रोजी होणार्‍या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्वेता असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

समुपदेशनाबरोबर कोडविषयी जनजागृती

डॉ. माया तुळपुळे यांनी स्थापन केलेला 'श्वेता असोसिएशन' हा स्वमदत गट 2001 पासून गेली 22 वर्षे शरीरावर पांढरे डाग असलेल्या व्यक्तींसाठी काम करत आहे. वधू-वर मेळावे, जाहीर सभा, समुपदेशन, कोडविषयी जनजागृती करणारे 'रंग मनाचे' हे मासिक इत्यादी अनेक कामे श्वेता असोसिएशनमार्फत केली जातात.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news