

कल्याणीनगर परिसरातील भरधाव पोर्शे कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण व तरुणीचे रस्त्यावरील रक्त सुकलेलेही नव्हते, त्यापूर्वीच आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब रेकॉर्डवर घेतल्यानं त्यांना फितूर केले जाऊ शकते. गुन्ह्यातील आरोपींनी यापूर्वीही पुराव्यात छेडछाड केली आहे. त्यांना जामीन दिल्यास पुन्हा एखादी मोडस ऑपरेंडी वापरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी गुन्ह्यातील सर्व आरोपींचा जामीन फेटाळला. हा एक गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून, आरोपींना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश पोहोचू शकतो असेही न्यायालयाने या वेळी नमूद केले.
विशाल आणि शिवानी अग्रवाल हे दोघे समाजातील आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती आहेत. डॉ. अजय तावरे , डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह इतर आरोपींवर दबाव टाकून रक्ताचे नमुने बदलण्यात दोघे यशस्वी ठरले. त्यांना जामीन मिळाला तर ते साक्षीदारांना देखील फितूर करण्याची शक्यता आहे, असे न्यायाधीशांनी आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, अपघातातील पोर्शे कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांनी बाल न्याय मंडळात (जेजेबी) अर्ज केला आहे. या अर्जावर 28 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.
या प्रकरणातील अल्पवयीन बिल्डरपुत्राची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी विशाल अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड येरवडा कारागृहात आहेत. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर, न्यायालयाने बचाव पक्षासह सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत गुरुवारी (दि. 22) निकाल दिला. न्यायाधीश मुधोळकर यांनी 45 पानांची जामीन ऑर्डर केली असून, त्यात गुन्ह्याच्या संदर्भातील विविध निरीक्षणे नोंदविली आहेत.
अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये मद्याच्या नशेत असलेल्या त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणखी दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. आदित्य सूद (वय 52) आणि आशिष मित्तल (वय 37) अशी त्यांची नावे असून, अरुणकुमार देवनाथ सिंग (47, रा. विमाननगर) याचा पोलिस शोध घेत होते. दरम्यान, सिंग याने या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी अॅड. आबिद मुलाणी यांच्यामार्फत अर्ज केला आहे. त्यावर युक्तिवाद करताना अॅड. मुलाणी म्हणाले, सिंग याचा मुलगा या गुन्ह्यात आरोपी नाही. तो कारमध्ये पाठीमागील सीटवर बसला होता. सिंग यांनी रक्ताचा नमुना कुणालाही दिलेला नाही. पोलिसांनी पाठविलेल्या नोटीसलाही त्यांनी प्रतिसाद दिला आहे.