

पुणे: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेसोबत यायचे आहे. पण, त्यांना कुणी घेत नाही. त्यामुळे संजय राऊत हे अमित शहा यांचा दुस्वास करतात. पुण्यात काय राहिलं तुमचं, मुंबईतदेखील 97 नगरसेवकांपैकी 57 नगरसेवक हे शिंदेंकडे गेले. तरीसुद्धा संजय राऊत दूषणे देत आहेत. जर ते सत्तेत आले नाहीत तर त्यांना मुंबईत नगरसेवक पदासाठीदेखील माणूस मिळणार नाही, अशी जळजळीत टीका उच्च, तंत्रशिक्षण व संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली.
पाटील म्हणाले, अमित शहा रायगडावरती छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीचे दर्शन घ्यायला आले होते. या समाधीचा जीर्णोद्धार केल्यानंतर शंभर वर्षे होत असल्याने अमित शहा हे राज्यात आले होते. त्यांचे स्वागत करायचे सोडून संजय राऊत त्यांच्यावर टीका करत आहेत. राजकीय शत्रुत्व असावे.
मात्र, असे नाही. देशाचे गृहमंत्री हे मोठे शिवभक्त आहेत. अमित शहा यांनी शिवरायांवर स्वतः पाचशे पानांचे पुस्तक लिहिले असून, ते पुण्यात की दिल्लीत प्रकाशित करावे, यासाठी राहिले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर राऊतांना चक्कर येईल, असे पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले, राज्यात भाजपला 137 जागा मिळाल्या. सहयोगी पक्ष म्हणून महायुतीला 235 जागा मिळाल्या. या सर्व आमदारांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री बनवले.
देवेंद्रजींचं व्यक्तिमत्त्व सर्वमान्य आहे. याच देवेंद्रजींनी 2014 ते 2019 मध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला. यासोबतच अनेक सुविधा, होस्टेल, भत्ते दिले. त्यांच्याविरुद्ध दलित, मराठा, ओबीसी जाऊ शकत नाहीत. ओबीसीचे वेगळे मंत्रालय देवेंद्रजींनी सुरू केले. त्यामुळे देवेंद्रजी विरुद्ध फुले, शाहू, आंबेडकर अशाप्रकारचा वाद संजय राऊत यांच्या मनात आहे, तो कधीही अस्तित्वात येणार नाही.
यापूर्वी अनेक मराठे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही. देवेंद्रजी हे जातीने ब्राह्मण असले, तरी ते कर्मठ ब्राह्मण नाहीत. तो काळ वेगळा होता. आता काळ वेगळा आहे. त्यामुळे चित्रपटात अशी दृश्ये दाखवली असतील, तर त्यावर आक्षेप घेतला असेल, तर ठीक आहे. मात्र, देवेंद्रजी हे कर्मठ नाहीत, या सगळ्या कल्पना राऊत यांच्या मनातल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
चार माणसे घरात असतील तर भांड्याला भांडं लागतं
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली, या प्रश्नाच्या उत्तरावर पाटील म्हणाले, रक्ताची चार माणसे घरात असतील तरी भांड्याला भांडं लागतं. इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. अजितदादांची वेगळी, एकनाथ शिंदे यांची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी. अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीची लोकं एकत्र काम करतात. खळखळ झाली म्हणजे ते जिवंत असल्याचे लक्षण आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा लवकरच उभारणार
अरबी समुद्रातील छत्रपती श्रीशिवराय यांच्या स्मारकाबद्दलदेखील आम्ही पर्यावरणवाद्यांविरुद्ध हायकोर्टात केस जिंकली. मी मिनिस्टर असताना या स्मारकाचे टेंडर देऊन ते सुरू करण्यात आले होते. तब्बल 2700 कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. स्मारकाचे काम 10 टक्के पूर्ण देखील झाले होते. मात्र, त्यानंतर सुप्रिम कोर्टात कामाला स्थगिती दिली. ही स्थगिती उठवण्यात आली असून, ही केस पुन्हा हायकोर्टात आली आहे. ही केस आम्ही ताकदीने लढवत आहोत. त्यामुळे सर्व परवानग्या मिळून हे स्मारक लवकरच पूर्ण केले जाईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
घटना हजारो वर्षे बदलावी लागणार नाही
भारतीय राज्यघटनेला समतेचा, बंधुत्वाचा आधार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर देशाचा कारभार सुरू आहे. ही घटना इतकी अचूक आहे की पुढची हजारो वर्षे ती बदलावी लागणार नाही, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
आरक्षण टिकविण्यासाठी सरकारचे प्रयत्न
मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकविण्यासाठी राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. घटनेमध्ये दिलेले संविधानात्मक आरक्षण, ओबीसीचे आरक्षण व त्याअंतर्गत दिलेले मराठा आरक्षण हे कायद्याने दिलेले आहे. घटनेच्या कलम 15 आणि 16 द्वारे ते देण्यात आले आहे. हे आरक्षण घटनेत नसले तरी घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वात आहे. त्यानुसार हे मराठा आरक्षण सरकारने दिले असून, ते टिकवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या दीड वर्षापासून हे आरक्षण दिले आहे. मात्र, सरकारने व्यूहरचनाच अशा पद्धतीने केली आहे की त्यामुळे हे आरक्षण जाणार नाही, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
इंदू मिल स्मारक लवकरच लागणार मार्गी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक पूर्ण होत आले असताना अनेक दलित संघटनांनी पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी केली होती. त्यामुळे पुतळ्याची उंची वाढवावी लागली. एखादी गोष्ट बदलली की नव्याने टेंडर काढावे लागते. लवकरच स्मारकाचे काम मार्गी लावले जाईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.