

सुषमा नेहरकर-शिंदे
खेड तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील टेकवडी गाव पुणे जिल्ह्यातील पहिले सोलर गाव झाले आहे. तरुण व उच्चशिक्षित सरपंच विठ्ठल शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे टेकवडी गाव वीजबिलमुक्त तर झालेच; शिवाय शिल्लक राहिलेली वीज महावितरण कंपनीला विकून गावाला अधिकचे पैसे देखील मिळणार आहेत. फ्रान्सच्या फोरविया फाउंडेशन कंपनीने तब्बल 66 लाखांचा सीएसआर निधी वापरून हा प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प देशासाठी मॉडेल ठरला आहे.
खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दुर्गम भागातील 60 ते 70 घरांचे छोटेशे टेकवडी गाव. भारनिमयन व विजेच्या नादुरुस्त लाइनमुळे गावात फार कमी वेळा वीज उपलब्ध असायची. यामुळेच गावात पाणी योजना असूनही वीज नसल्याने महिलांना दोन-दोन किलोमीटरवरून डोक्यावर पाणी वाहून आणावे लागत होते. यामुळेच शिंदे यांनी महिंद्रा कंपनीकडून सीएसआरच्या माध्यमातून त्वरित गावासाठी तब्बल 10 एचपीचा सोलर पंप बसवून घेतला. यामुळे आता गावात शून्य पाणीपट्टी व 24 तास पाणीपुरवठा उपलब्ध झाला.
त्यानंतर सरपंच शिंदे यांनी संपूर्ण गाव सोलर करण्याचा निर्णय घेऊन फ—ान्सच्या फोरविया फाउंडेशन कंपनीच्या माध्यमातून व महावितरणच्या सहकार्याने गावात तब्बल 66 लाखांचा सीएसआर निधी खर्च करून 100 टक्के सोलर गावाची निर्मिती केली. यामध्ये गावातील सर्व 70 घरे, शाळा, मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर सोलर पॅनल बसविण्यात आले.
यामधून आता गावात दररोज तब्बल 98 किलो व्हॅट वीजनिर्मिती होत आहे. महावितरण कंपनीच्या मदतीने स्वतःचा वापर भागवून जास्तीची वीज शासनाला विक्री करणारे टेकवडी हे देशातील पहिले गाव ठरले आहे.
सोलर गावामुळे टेकवडी गावातील सर्व 70 कुटुंबांना मोफत वीजपुरवठा, गावात पाणी योजना, 100 टक्के स्ट्रीट लाइट सोलरवर झाली. गावात सीएसआरमधून इलेक्ट्रॉनिक रिक्षा घेण्यात आली असून, या माध्यमातून शाळेतील मुलांना व गावातील रुग्णांना मोफत प्रवास सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विठ्ठल शिंदे, सरपंच, टेकवडी (ता. खेड)
टेकवडी गावातील 70 घरांच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात आले असून, स्वतंत्र वीजमीटर बसविण्यात आले आहे. एका घरामध्ये महिन्याला सरासरी 120 युनिट वीज तयार होणार असून, एका घराचा महिन्याचा वापर सरासरी 70 युनिट एवढा आहे. यामुळे शिल्लक 50 युनिट वीज महावितरण कंपनी विकत घेणार आहे.
अजय पोफळे, शाखा अधिकारी, पाईट महावितरण
टेकवडी हे गाव जिल्ह्यातील पहिले व राज्यातील दुसरे सोलर गाव झाले, याचा तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने खरोखर अभिमान आहे. या सोलर गावचे बुधवारी (दि. 9) उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन होणार आहे.
दिलीप मोहिते पाटील, आमदार खेड