चाकण: रायगड जिल्ह्यातील वाकन आणि पुणे जिल्ह्यातील उद्योगनगरी चाकण ही दोन्ही गावे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 या एकाच महामार्गाच्या लगत आहेत. हा महामार्ग ए, बी, सी, डी अशा टप्प्यात खूप मोठ्या अंतरावर कोकण ते मराठवाडा असा विसरलेला आहे. यामधील तळेगाव चाकण ते शिक्रापूरदरम्यानचा हा 548 डी महामार्ग केवळ राजकीय अनास्थांनी मागील 25 वर्षांत होऊ शकला नाही.
रायगड जिल्ह्यातील वाकन आणि पुणे जिल्ह्यातील उद्योगनगरी चाकण हा महामार्ग विविध राज्य महामार्ग एकत्रित करून मागील काळात घोषित करण्यात आला आहे. हा महामार्ग, रायगड जिल्ह्यातील मुरूड, नांदगाव, रोहा, पाली, वाकन, खोपोली ते पुढे तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि शिरूर व बीडच्या केजपर्यंत विस्तारलेला आहे.
चाकण भागात हा महामार्ग 548 डी म्हणून ओळखला जातो. हाच 548 ए महामार्ग रायगड जिल्ह्यात मात्र प्रशस्त व सिमेंट काँक्रिटचा झालेला आहे. मात्र, दोन्ही जिल्ह्यांत रस्त्यांची स्थिती फारच भिन्न असून, तळेगाव, चाकण ते शिक्रापूरदरम्यान हा महामार्ग वाहतूक कोंडीचा आणि अपघातांचा महामार्ग म्हणून सर्वश्रुत आहे.
तोच मार्ग प्रशस्त आणि वाहतुकीसाठी सोईस्कर म्हणून रायगड जिल्ह्यात ओळखला जातो. मागील अनेक वर्षात तळेगाव-चाकण ते शिक्रापूर रस्त्याच्या घोषणा झाल्या आणि हवेत विरल्याने हा महामार्ग खरोखर होईल का? असा प्रश्न जनता विचारत आहेत.
त्या महामार्गाला पर्याय
चाकण-तळेगाव व शिक्रापूर आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शिरूर-खेड- कर्जत असा नवीन मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाडा येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरूर-खेडमार्गे थेट कर्जतला जाणार असल्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी सांगत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून फक्त कागदावरच असलेल्या या मार्गासाठी आता शासन दरबारी हालचाली सुरू झाल्या असून, पुढील आठवड्यात शासनाकडून या प्रकल्पाला मान्यता मिळणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर मार्गे थेट कर्जत जाणार्या रस्त्याचा एक पर्याय समोर आला. शिरूर-पाबळ-राजगुरुनगर मार्गे पाईट-वांद्रे-कर्जत असा सुमारे 135 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे. या नवीन मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे.