

पुणे : राज्यात यंदा स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला असून, १ जानेवारी ते २१ सप्टेंबरदरम्यान तब्बल २,३२० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ७०९ फ्लूचे रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याचे आरोग्य विभागातील आकडेवारीतून समोर आले असल्याने पुणेकरांना काळजी घेण्याचे अधोरेखित होत आहे. मुंबईत ६२६ रुग्णांची नोंद आरोग्य विभागांतर्गत करण्यात आली आहे, तर पिंपरी-चिंचवडमध्येही ११३ रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यातील एकूण रुग्णांपैकी ३९० रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, १,९२२ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. सध्या एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. मृत्यूंच्या बाबतीत नागपूरमध्ये चार, नाशिकमध्ये तीन आणि नवी मुंबईत एका मृत्यूची नोंद झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा तपासण्यांचे प्रमाण कमी असतानाही रुग्णसंख्या वाढली आहे. २०२५ मध्ये ३० लाख ९ हजार ४५९, तर २०२४ मध्ये २४ लाख १५ हजार ८२ जणांची तपासणी झाली होती. यंदा २९ सप्टेंबरपर्यंत ११ लाख ३५ हजार ३२८ तपासण्या झाल्या आहेत. २०२५ मध्येही आठ मृत्यू झाले होते; मात्र २०२४ मधील ७२ आणि २०२२ मधील २९५ मृत्यूंच्या तुलनेत यंदाची मृत्युसंख्या कमी आहे.
तज्ज्ञांच्या मते, ताप, अंगदुखी, कोरडा खोकला, वाहणारे नाक आणि घसादुखी ही प्रमुख लक्षणे आहेत. उच्च जोखमीच्या रुग्णांमध्ये आजार गंभीर होण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय सल्ल्याने लवकर उपचार घेणे आवश्यक आहे. राज्यात उच्च जोखमीच्या गटांसाठी ऐच्छिक मोफत फ्लू लसीकरण सुरू असून, ओसेलटॅमिव्हिरसह औषधांचा पुरेसा साठा असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार २०२४ पासून उच्च जोखमीच्या गटांना मोफत, ऐच्छिक लसीकरण सुरू आहे. सध्या ही लस दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील गर्भवती महिला, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना देण्यात येत आहे. वेळेवर उपचार आणि ओसेलटॅमिव्हिरची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी खासगी रुग्णालये आणि औषध दुकानांशी समन्वय राखला जात आहे.
डॉ. संदीप सांगळे, सहसंचालक, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य